Vasai ZP School : गरीब गरजू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी जिल्हा परिषद मराठी शाळा ही एकमेव आशेचा किरण आहे. मात्र असं असताना या शाळांच्या बाबतीत प्रशासन उदासीन असल्याचं दिसून येत आहे.
Vasai ZP School Issue
Vasai ZP School : गरीब गरजू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी जिल्हा परिषद मराठी शाळा ही एकमेव आशेचा किरण आहे. मात्र असं असताना या शाळांच्या बाबतीत प्रशासन उदासिन असल्याचं दिसून येत आहे. कारण वसईतील नवघर जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या अभावी पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावं लागत आहे. तर दुसरीकडे जानकीपाडा जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पावसाळ्यात इमारतीचे छत गळत असल्यामुळे वर्ग खोल्यांमध्ये पाणी जमा होऊन, विद्यार्थ्यांना त्यात शिक्षण घ्यावं लागतं.
शिक्षिकांअभावी विद्यार्थी एकाच वर्गात
मुंबईजवळ असलेल्या वसईतील नवघर या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावं लागत आहे. या शाळेत एकूण 153 विद्यार्थी असून, त्यांना शिकवण्यासाठी तीन शिक्षिका नेमण्यात आल्या आहेत. त्यातील एका शिक्षिकेची बदली झाल्यामुळे सध्या दोन शिक्षिकांवर शाळेची मदार आहे. त्यामुळे एकाच वर्गात बेंचचे चार रो करण्यात आले असून, त्याप्रमाणे मुलं बसवण्यात आली आहेत. खरंतर इथे सात शिक्षिकांची आवश्यकता आहे. ही शाळा दोन वेळेत भरवली जात होती. मात्र सध्या एका वेळेतच ही शाळा भरवली जाते. वरिष्ठांना सांगूनही काही दाद मिळत नसल्याची खंत येथील शिक्षिकेनी व्यक्त केली आहे.
शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ही गोष्ट कळली तेव्हा काही पालक आपल्या पाल्याला दुसऱ्या शाळेत टाकण्यासाठी दाखले मागत आहेत. मात्र शाळा दाखला देत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे, अशी प्रतिक्रिया पालक देत आहेत. मराठी शाळा टिकली पाहिजे असं सर्वांना वाटतं. मात्र स्वतः प्रशासनच याबाबत उदासिन असल्याचं दिसून येत आहे.
जानकीपाडा जिल्हा परिषद शाळेच्या छत आणि भिंतींना भेगा
वसईतल्याच गोखिवरे येथील जानकीपाडा जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पावसाळ्यात इमारतीचे छत गळत असल्यामुळे वर्ग खोल्यांमध्ये पाणी जमा होऊन, विद्यार्थ्यांना त्यात शिक्षण घ्यावं लागतं. मुलांनी छत गळत असल्याने छताला पेपरही लावले आहेत. इमारतीच्या छताला आणि भिंतींना भेगा गेलेल्या आहेत. तसेच इमारत धोकादायक असून केव्हाही कोसळू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेने या शाळेला धोकादायक असल्याची नोटीस ही दिली आहे. या सर्व गंभीरबाबी शिवसेनेने निदर्शनास आणून देखील, प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. स्थानिक प्रशासन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असून एखादी गंभीर घटना घडल्यास त्यास संपूर्णपणे गटशिक्षण अधिकारी जबाबदार असतील अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे. इथल्या शिक्षिकांनीही वेळोवेळी शाळा व्यवस्थापनाला कळवलं आहे. मात्र शाळा व्यवस्थापन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शाळेतील मुलांना कुठे स्थलांतरित करायचं हा महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.