पालघर : एकीकडे केंद्र सरकार डिजिटल आणि कॅशलेस इंडियाची भाषा करत आहे, तर राज्य शासनाकडून 'आरोग्य यंत्रणा तुमच्या दारी' अशी संकल्पना राबवण्यात येत आहे. मात्र ज्या गावात अजूनही रस्ताच पोहचला नाही, त्या गावातील रुग्णांच्या समस्या संपता संपेना. अशी परिस्थिती आजही कायम आहे. पाथर्डी ग्रामपंचायत हद्दीतील भाटीपाड्यातील एका रुग्ण महिलेला चालता येत नसल्याने, त्या रुग्णाला ग्रामस्थांनी झोळीत बांधून वाहत्या नदीतून डोंगर, टेकड्या चढत, जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्ण महिलेला झोळीत बांधून काळशेती नदीतून रुग्णालयात दाखल केल्याचा  प्रकार शुक्रवारी घडला आहे. या भागातील गरोदर महिलांसह रुग्णांचे अतोनात हाल होत असून, स्वातंत्र्यानंतर त्या भाटीपाड्यातील रुग्णांसह, नागरिकांनाही हाल सहन करावे लागत आहेत.


जव्हार तालुक्यातील भाटीपाडा येथील 40 वर्षीय लक्ष्मी लक्ष्मण घाटाळ या महिलेच्या पायाला मोठी दुःखापत झाली होती. जखम अधिक वाढत गेल्याने, या रुग्ण महिलेला पायी चालणे कठीण झाले. या जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले नाही, तर तीचा जीव जाण्याची शक्यता होती. अखेर तेथील ग्रामस्थांना त्या जखमी महिलेला झोळीत बांधून वाहत्या काळशेती नदीतून जावं लागलं. काळशेती नदीचे 100  मीटरचे पात्र असून ती मोठी नदी आहे. सध्या पावसाळा असल्याने, नदीचे पात्र भरलेलं आहे. त्यानंतर त्या महिलेला झोळीतून डोंगर, टेकड्या चढून मुख्य रस्त्यापर्यंत तीन किमी पायी प्रवास करावा लागला. त्या जखमी महिलेवर सध्या जव्हारच्या कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत पाथर्डी हद्दीतील भाटीपाड्यात एकूण 35 कुटुंबे वास्तव्य करत आहेत. हा भाटीपाडा काळशेती नदीच्या बाजूला आहे. येथील कुटुंबाची शेतीची जागा, प्लॉट त्या बाजूला असल्याने अनेक वर्षांपासून ही कुटुंबे त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. त्या भाटीपाडा गावात जाण्यासाठी रोजगार हमीतून केलेला कच्चा रस्ता आहे. तसेच पावसाळ्यात साधी मोटारसायकल देखील त्या भाटीपाड्यात जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता बंद असतो. तसेच भाटीपाड्यात जाण्यासाठी काळशेती नदीवर पूल नसल्याने, पावसाळ्याची तजवीज करून ठेवावी लागते. पावसाळ्यात रुग्ण, गरोदर महिला, सर्प दंश झालेल्या रुग्णांचे हाल होऊन अनेकांना जीव गमवावा लागल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. 


भाटीपाड्यात नागरिकांनी अनेक वर्षांपासून नदीवर पूल आणि रस्त्याची मागणी केली आहे. मात्र त्या गाव-पाड्यांना जाण्यासाठी अजून रस्त्याचे झाले नसल्याचे चित्र आहे. तसेच या भागात पाथर्डीपैकी भाटीपाडा, तर ग्रामपंचायत झापचे काही पाडे असून, असे जवळपास 4 ते 5 पाडे आहेत. मात्र त्या आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्यापासून रस्ताच झाला नाही. तर पावसाळ्यात त्या परिसरातील नागरिक आणि रुग्णांचे नेहमीच हाल पाहायला मिळतात. 


त्या आदिवासी पाड्यांना अजूनही रस्ताच नाही, तर मग अॅंब्युलन्स येणार तरी कुठून? ग्रामस्थ अॅंब्युलन्सची वाट न पहाता वर्षानुवर्षे रुग्णांना, गरोदर महिलांना दवाखान्यात पोहोचविण्यासाठी  झोळीचा आधार आहे. पुन्हा एकदा ऐन पावसाळ्यात अशी घटना घडली आहे. रुग्ण महिलेला झोळीने बांधून दवाखान्यात पोहोचवावे लागले. येथील आजारी रुग्णांना ग्रामस्थही एकमेकांना धावून येतात, आणि यावेच लागते. एकमेकांवर ही पाळी येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 


गरोदरपणात या भागातील महिला नातेवाईकांकडे जातात
मनमोहाडी, भाटीपाडा आणि इतर पाड्यातील गरोदर माता, रुग्ण, महिलेची प्रसुतीची वेळ, तारीख जवळ आली की गरोदर महिलांना तालुक्याच्या ठिकाणी, त्यांच्या नातेवाईकांकडे येऊन थांबावे लागते.