कल्याण : नागरिकत्व कायद्यात सुधारणा केल्याचा अनेक ठिकाणी निषेध होत असतानाच निर्वासितांचं शहर अशी ओळख असलेल्या उल्हासनगरमध्ये मात्र या सुधारणेचं स्वागत करण्यात येतं आहे. कारण यामुळे मागील काही वर्षात पाकिस्तानातील अत्याचाराला कंटाळून भारतात आलेल्या हजारो निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे.

निर्वासित आणि शरणार्थींसाठी नागरिकत्व कायद्यात करण्यात आलेल्या बदलानंतर देशात अनेक ठिकाणी रोषाचं वातावरण आहे. कायद्यातला हा बदल काहींना अन्यायकारक वाटतोय, तर काही जणांसाठी मात्र हा बदल म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात आहे. तीही शरणार्थी म्हणून नव्हे तर भारतीय म्हणून. उल्हासनगर हे निर्वासितांचं शहर म्हणून ओळखलं जातं. फाळणीच्या वेळी अत्याचारातून सुटका करून घेत पाकिस्तानातून भारतात आलेले हिंदू सिंधी बांधव या शहरात वसले. मात्र त्याचवेळी अनेक हिंदू हे पाकिस्तानातही राहिले. या हिंदूंना आजवर अनन्वित अत्याचार सहन करावे लागले आहेत. विशेषतः बाबरी मशीद घटना आणि नुकताच कलम 370 चा निर्णय, राममंदिराचा निकाल या घटनांचा थेट परिणाम पाकिस्तानातल्या हिंदूंवर झाला, अर्थातच त्यांच्यावरील अत्याचारात वाढ झाली.

हे अत्याचार इतक्यावरच थांबले नाहीत, तर अक्षरशः हिंदूंच्या मुलींना वाट्टेल तेव्हा उचलून न्या, त्यांचं धर्मांतर करा, लग्न करा आणि दोन रात्री सोबत ठेवून सोडून द्या असे भयानक प्रकारही कट्टरपंथियांकडून होऊ लागले. या प्रकारामुळे हिंदू स्त्रिया स्वतःची ओळख लपवू लागल्या. आम्हाला बुरखा घालावा लागायचा, तसंच कुणाला नावं सांगायचीही आम्हाला भीती वाटायची, मात्र आता आम्हाला भारतात सुरक्षित वाटत असल्याचं इथं राहत असलेल्या निर्वासित महिला सांगतात.

या सगळ्या अत्याचारामुळे धास्तावलेल्या हिंदूंनी अखेर पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आधी टुरिस्ट व्हिसावर भारत गाठला आणि मग भारत सरकारपुढे याचना करून लॉंग टर्म व्हिसावर भारतात राहू लागले. इथेच व्यवसाय सुरू केला, आपलं विश्व उभारलं. मात्र आजही तांत्रिक दृष्ट्या ते पाकिस्तानचे नागरिक असल्यानं त्यांच्यात धाकधूक कायम होती. मात्र कायद्यातील दुरुस्तीमुळे आता आम्हाला भारतीय नागरिकत्व मिळणार असल्याचा या हिंदू शरणार्थींना आनंद आहे, असे हे निर्वासित सांगत आहेत.

या निर्वासितांना भारतात आल्यानंतर इथल्या सिंधी बांधवांनी उभं राहण्यासाठी मोलाची मदत केली. त्यांना व्यवसाय उभा करून दिला. मुळातच सिंधी समाज हा स्वावलंबी आणि व्यापारी वृत्तीचा समाज असल्यानं त्यांना इथे जुळवून घेण्यात अडचणी आल्या नाहीत. त्यामुळे आज कपड्याच्या व्यवसायात या निर्वासितांनी जम बसवला आहे, असे सिंधी समाजसेवक दीपक मंगतानी यांनी सांगितलं.

या निर्वासितांना आत्तापर्यंत दरवर्षी व्हिसाची मुदत वाढवून घ्यावी लागत होती. कुठलीही कागदपत्रं नसल्यानं अडचणी येत होत्या, आणि शरणार्थी म्हणून जगावं लागत होतं. मात्र नागरिकत्व कायद्यातील सुधारणेमुळे आता त्यांना त्यांचं उर्वरित आयुष्य सुरक्षितरीत्या घालवता येणार आहे.