मुख्यमंत्री म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात कायद्याबाबत चर्चा व्हायची आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात भिती बाळगू नये. कायद्याला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत निवेदन द्यावे. त्याबाबत आपण संबंधितांशी चर्चा करण्यास तयार आहोत. आंदोलानात हिंसाचाराचा मार्ग न अवलंबता राज्याच्या लौकीकास धक्का लागू नये याची दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील जनतेला शांतता बाळगण्याबाबत आवाहन करावे, असेही ठाकरे म्हणाले.
यावेळी ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र देशाला नेहमी वेगळी दिशा देतो. कोणतीही भीती मनात ठेवू नका. काही लोकं विष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या लोकांच्या अमिषांना बळी पडू नका, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शांतता आणि सुव्यवस्थेला गालबोट लागेल असं काही करु नका, असंही ते म्हणाले. या देशातून तुम्हाला हाकललं जाईल, असा गैरसमज होऊ देऊ नका, असंही ते म्हणाले.
हेही वाचा - CAA Protests | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात महाराष्ट्रात जागोजागी आंदोलन, काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे
आज सलग दुसऱ्या दिवशी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यात आंदोलन सुरु आहेत. विना नेता आणि विना झेंडा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध मोर्चे निघाले आहेत. औरंगाबादेत एमआयएमचा विराट मोर्चा निघाला. हातात तिरंगा घेऊन मुस्लिम समाजानं नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला तीव्र विरोध दर्शवला. तिकडे नागपूर आणि ठाण्यात नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम समाजानं आंदोलनाला सुरूवात केली. मशिदींमध्ये हजारोंच्या संख्येनं मोर्चेकरी जमले. नागपुरातील चिटणीस पार्कसमोरी ईदु मियाँ मशिदीबाहेर जवळपास एक तासापासून आंदोलन सुरू आहे. ठाण्यातील राबोडीत मुस्लिम समाजानं मोर्चा निघाला. याशिवाय पुण्यातही मुस्लिम समाजाकडून आंदोलनाला सुरूवात झाली आहे. एकीकडे शांततेत आंदोलन सुरु असताना दुसरीकडे बीड आणि जालन्यात मोर्चाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले.