Buldhana News: गेल्या दोन महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 18 गावांमध्ये केस गळतीने (Buldhana Hair Loss)  नागरिक हैराण असताना अद्यापही आयसीएमआर (ICMR) या संशोधन संस्थेचा अधिकृत अहवाल आलेला नाही. यावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना पत्रकारांनी विचारलं असता, प्रतापराव जाधव यांनी ज्येष्ठ संशोधक पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर (Himmatrao Bawaskar) यांनी केलेल्या संशोधनावर टीका केली. इतकंच नाही तर आयसीएमआर म्हणजे आपल्या बावस्कर सारखी खाजगी कंपनी नाही....! अशा एकेरी शब्दात त्यांनी पद्मश्री मिळालेल्या संशोधकावर टीका केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) ही संतापले. दरम्यान यावर बोलताना डॉ. बावस्कर चांगलेच संतापले असून दावा खोटा ठरला तर मी माझी डिग्री फाडून टाकेल असे म्हणत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या (Prataprao Jadhav) टीकेला पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्करांनी प्रत्युत्तर देत एकप्रकारे आव्हान दिले आहे.


तर हिम्मतराव बावस्कर हे पद्मश्री सन्मान परत करतील- हर्षवर्धन सपकाळ


एकीकडे केस गळतीने नागरिक हैराण असताना पद्मश्री मिळालेल्या वरिष्ठ संशोधकाने संशोधन करून सरकार देत असलेल्या धान्यामुळे केस गळती होत असल्याचा अहवाल दिला. मात्र यांनी त्यांच्या अहवालावर टीका केली. तर नागरिक हैराण असताना जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची व्यवस्था या नागरिकांची केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं. " जर हिम्मतराव बावस्कर खोटे असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी सिद्ध करून दाखवावं, जर ते सिद्ध झालं तर हिम्मतराव बावस्कर हे पद्मश्री सन्मान परत करतील. मात्र असं न करता जनतेला सोयी सुविधा न पुरवता जिल्हाधिकारी यांनी नेत्यांच ऐकलं व निकृष्ट प्रकारच धान्य पुरवठा करून जनतेच्या जीवाशी खेळ केला. याला जिल्हाधिकारी दोषी असल्याही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.


एकंदरीत जिल्ह्यात केस गळतीने नागरिक हैराण असताना मंत्री, नेते व संशोधकात कलगीतुरा रंगल्याचं बघायला मिळत आहे. मात्र यात आयसीएमआरचा अहवाल अद्यापही न आल्याने जनता भरडली जात आहे.


अन् नागरिकांना पुन्हा केस उगवू लागलेत..


बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 16 ते 17 गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते. त्यानंतर देशाच्या सर्वोच्च असलेल्या आयसीएमआरच्या पथकाने या परिसरात भेट देऊन केस गळतीचा कारणांचा शोध लावला आहे. या परिसरातील लोक खात असलेल्या राशनच्या गहू किंवा इतर पदार्थांमधून या नागरिकांच्या शरीरात सेलेनियम नावाचा जड धातूचे प्रमाण वाढलं होतं. मात्र आता या परिसरात नागरिक हे गहू खात नसल्याने पुन्हा या नागरिकांना केस उगवू लागले आहेत. अनेक नागरिकांच्या डोक्यावरील केस हे पहिल्यापेक्षाही चांगले आले आहेत. त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शिवाय ज्येष्ठ संशोधक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार राशनच्या गव्हातून या नागरिकांच्या शरीरात सेलेनियम गेल्याचे म्हटले आहे. मात्र आता या परिसरात राशनचे गहूच नागरिक खात नसल्याने त्यांचे सेलेनियमचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्याची शक्यता आहे.


हे ही वाचा 


Buldhana Hair Loss Case : बुलढाणा केस गळती प्रकरण, 'एबीपी माझा'च्या बातमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा शिक्कामोर्तब!