Champions Trophy 2025 Team India: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळविला. या विजयासह भारताने अ गटात अव्वल स्थान मिळविले असून, 4 मार्चला पहिल्या उपांत्य सामन्यात त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. 


चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेतील गट टप्प्यातील भारत आणि न्यूझीलंडचा (India vs New Zealand) शेवटचा सामना होता. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 249 धावा केल्या, ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या 79 धावांच्या खेळीने महत्त्वाचे योगदान दिले. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडला 205 धावा करता आल्या. केन विल्यमसनने 81 धावांची खेळी केली, मात्र त्याला संघाला विजयापर्यंत पोहचवता आले नाही. त्यामुळे भारताने हा सामना 44 धावांनी जिंकला.  






ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगला सामना होईल- रोहित शर्मा


न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने महत्वाचं विधान केलं आहे. उद्या म्हणजेच 4 मार्चला दुबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. यावर रोहित शर्मा म्हणाला की, हा चांगला सामना होईल. ऑस्ट्रेलियाचा आयसीसी स्पर्धा खेळण्याचा चांगला इतिहास आहे. आम्हाला योग्य गोष्टी करणे महत्वाचे आहे, असं रोहित शर्माने सांगितले. तसेच वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीचं देखील रोहित शर्माने कौतुक केलं. 


पुढच्या सामन्यासाठी आता आम्हाला थोडा विचार करावा लागेल- रोहित शर्मा


आमच्या गोलंदाजीचा दर्जा पाहता, मला लक्ष्याचा बचाव करण्याचा आत्मविश्वास होता. वरुण चक्रवर्तीकडे गोलंदाजीमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आम्हाला त्याला वापरून पाहायचे होते आणि तो आम्हाला काय देऊ शकतो ते पहायचे होते. पुढच्या सामन्यासाठी आता आम्हाला थोडा विचार करावा लागेल. ही चांगली डोकेदुखी आहे. लहान स्पर्धांमध्ये सतत चांगली कामगिरी चांगली राहणे खूप महत्त्वाची असते. आपण सामना जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सर्वकाही व्यवस्थित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सामन्यादरम्यान चुकाही होतात. पण त्यांना सुधारणे खूप महत्वाचे आहे, असं रोहित शर्मा म्हणाला. 






संबंधित बातमी:


Rohit Sharma : रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्ध मोठा डाव खेळला, वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात किवी फलंदाजांची दैना