नागपूर/मुंबई : नागपुरात झालेल्या तुफान पावसाने रस्ते जलमय झालेले पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. या पाण्यात अनेक वाहनांचंही मोठं नुकसान झालं. सकाळी साडे आठ ते दुपारच्या अडीच दरम्यान नागपुरात तब्बल 111 मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली आहे.
छत्रपती नगर, नरेंद्र नगर, मनिष नगर तसंच त्रिमूर्ती नगरच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. कालही नागपुरात दमदार पाऊस झाला होता.
शहराबरोबरच ग्रामीण भागातही चांगला पाऊस झाल्याने पेरण्यांना गती मिळणार आहे. दरम्यान पुढचे दोन ते तीन दिवस नागपुरात असाच पाऊस कायम राहण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.
मुंबईत पावसाची संततधार कायम
मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास समुद्राला मोठी भरती आली. त्यावेळी उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांचा अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी चौपाट्यांवर गर्दी केली होती.
मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. अंधेरी, पवई, कांजुरमार्ग, घाटकोपर आणि वांद्रे परिसरात संततधार कायम आहे. सकाळी काही वेळ पावसाने उसंत घेतली. पहाटेपासून झालेल्या पावसाने हिंदमाता, किंग्ज सर्कल, पवई आणि सायन परिसरात पाणी साचलं होते.
उत्तर महाराष्ट्रात पावसाची हजेरी
उत्तर महाराष्ट्रात मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तर धुळे जिल्ह्यातही तब्बल 20 दिवसांनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
उत्तर महाराष्ट्रात केवळ नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. नंदुरबार वगळता नाशिक, धुळे, जळगाव या भागांमध्ये चांगला पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
मराठवाड्यात पावसाची दांडी
सुरुवातीला जोरदार बरसलेल्या वरुणराजाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. मराठवाड्यातील जवळपास आठही जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कारण अनेक ठिकाणी पेरणी झालेली आहे, मात्र पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे. नांदेड शहरात दुपारी थोडा वेळ पाऊस झाला. मात्र ग्रामीण भागात पावसाने पाठ फिरवली आहे.
कोल्हापुरात जोरदार पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सतत कोसळत असलेल्या पावसाने चार बंधाऱ्यांचा पाणीसाठा वाढला आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 19 फुटांवर गेली आहे. चंदगड, गगनबावड्यातही जोरदार पाऊस बरसला.
भरतीमुळे कोकण किनारपट्टीचं नुकसान
कोकणच्या किनारपट्टीचं भरतीमुळे मोठं नुकसान झालं आहे. किनारपट्टीवरील बायागती समुद्राने आपल्या पोटात घेतली आहे. रत्नागिरी-गुहागरच्या वेळणेश्वर किनाऱ्यावरील संरक्षक भिंतीनाही लाटांचा तडाखा बसला. वेळणेश्वर,पट्ट्यासोबतच मिऱ्या, मांडवी, देवबागच्या समुद्रकिनाऱ्यालाही लाटांचा तडाखा बसला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, रोहा या भागांमध्येही चांगला पाऊस सुरु आहे.