मुंबई: राज्याच्या तिजोरीवर कर्जमाफीचा निश्चित भार येणार आहे.  आधीच राज्यात वित्तिय तूट आहे, ती भरून काढावी लागणार आहे. पण एकदा निर्णय घेतला की त्यातून मार्ग काढू. सध्या आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे, पण ती आम्ही शिवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.


पुणतांब्याच्या संपात सहभागी झालेल्या 40 गावच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

राज्याच्या तिजोरीवर कर्जमाफीचा निश्चित भार येणार आहे.  आम्हाला सुरु असलेल्या विकास प्रकल्पांसाठीच कर्ज काढावं लागणार होतं, मात्र आता इनोव्हेटिव्ह पद्धतीने पैसे उभे करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्य सरकारच्या मनात होतं, त्यामुळेच कर्जमाफी केली. जर मनातच नसतं, तर कर्जमाफी नाकारण्यासाठी अनेक कारणं होती, पण आम्हाला कर्जमाफी करायची होती, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य सरकारने अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत केलीच, पण नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही मदत केली. इतर राज्यांनी असं केलं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणलं.

वित्त विभागाने 15 हजार कोटींच्या वर कर्जमाफी करु नका अशा सूचना दिल्या होत्या, मात्र आम्ही त्याच्या पुढे जाऊन कर्जमाफी केली, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतीसाठी सोलार फिडर आणू. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात वीज मिळेल.  त्याची सुरुवात राळेगणसिद्धीतून होईल, असं त्यांनी सांगितलं.

समृद्धी महामार्गाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होणार आहे. दिलेल्या जमिनी कोल्ड चेन स्टोरेजसाठी वापरणार.  समस्या संपणार नाही पण पर्याय शोधत जाऊ. दरवेळेस आंदोलन करायची गरज नाही, चर्चेने नेहमी मार्ग निघू शकतो. सरकार चर्चेसाठी नेहमी तयार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.