Mumbai High Court : औरंगाबाद (Aurangabad)  आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात (High court) याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. या दोन्ही शहरांच्या नाव बदलण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून न्यायालयाचं लक्ष वेधण्यात आलेलं आहे. 


शिंदे-फडणवीस सरकारच्या दोन्ही निर्णयांना आव्हान


राज्यात सत्ता बदल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने राज्यातील दोन शहरांचा प्रामुख्याने नावे बदलण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या या घेतलेल्या दोन्ही निर्णयांना आव्हान देण्यात आलेले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर या नावाचा विरोध करणारी याचिका यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल करण्यात आली आहे. आता उस्मानाबादचे धाराशिव नाव बदलण्यास देखील आक्षेप घेण्यात आला असून या संबंधीची विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. शेख इस्माईल मसूद शेख व इतर 16 जणांनी मंत्रिमंडळाच्या 16 जुलै 2022 च्या उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा असे नामांतराच्या करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ऍड. सतीश बी. तळेकर यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.


याचिकेत काय म्हटलंय?


मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय, 1998 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धारशिव करण्यात आले होते, हा निर्णय शासनाने 2001 साली रद्द केला. राज्य शासनाने घेतलेला नामांतर निर्णय हा फक्त राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात आहे. फक्त राज्यामध्ये सत्तांतर झाले म्हणून असे नामांतरचे निर्णय घेता येणार नाही. तसेच नामांतराचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे असे याचिकेत नमुद केले आहे. या जनहित याचिकेत याचिकाकर्त्यांनी 16 जुलैचा उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यास अंतरिम स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयासमोर आज 23 ऑगस्टला सुनावणी ठेवण्यात आली आहे.


नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा पुनर्निणय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळानं आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले. त्यावेळी ठाकरे सरकारनं घेतलेला औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगित केला होता. 14 जुलैला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणे, थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड अशा निर्णयांचा सपाटा लावल्यानंतर पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा पुनर्निणय घेण्यात आला. लवकरच ठराव करुन प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारनं घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती.


इतर महत्वाच्या बातम्या


Mumbai Ganeshotsav : मुंबईत गणेशोत्सवाची ओढ! पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर, 'या' मुर्तींना मागणी अधिक


Todays Headline 23rd August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या