Maharashtra Osmanabad News : उस्मानाबाद :  उस्मानाबाद (Osmanabad) येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP)  प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील (Manisha Patil)  यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या अज्ञाताकडून चाकूने  हल्ला करून खुनाचा प्रयत्न  करण्यात आला. मात्र मनीषा पाटील यांनी प्रसंगावधान राखून हातावर वार झेलल्यामुळे त्या बचावल्या. या घटनेत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचतगटाच्या टेंडर प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात केलेल्या तक्रारींमुळे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. निपाणीकर यांचा हल्ल्यामागे हात असल्याचा संशय पाटील यांनी व्यक्त केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे पाटील यांच्या घरात बुधवारी संध्याकाळी चेहरा कपड्याने बांधलेल्या अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. हातात चिठ्ठी देऊन दुसऱ्या हाताने त्यांच्यावर धारदार चाकूने वार करून खूनी हल्ला चढवला. परंतु प्रसंगावधान राखून पाटील यांनी तो वार हातावर झेलला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांनी आरडाओरड करताच आजूबाजूच्या घरातील लोकांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. तोपर्यंत  हल्लेखोर मात्र पसार झाला होता. जखमी अवस्थेत नागरिकांनी पाटील यांना आनंदनगर पोलीस ठाण्यात आणले. तिथून जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. 


शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. निपाणीकर यांच्यावर संशय व्यक्त करून त्यांनीच  हा हल्ला घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिला बचत गटाच्या पोषण आहार वाटपाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमितता केल्याच्या प्रकरणात दाखल केलेल्या तक्रारी आणि आझाद मैदानावर केलेल्या उपोषणामुळे महिला आणि बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निपाणीकर हे अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांच्यावरच दाट संशय असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.


सीसीटीव्हीत घटना कैद


मनीषा पाटील यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याची घटना त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यातून घटनेचा उलगडा लवकरात लवकर होण्याची अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.


आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला


गेल्या आठवड्यात  काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव  यांच्यावर देखील अज्ञातांकडून हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यांच्या मतदारसंघातील कसबे दवंडा या गावात असताना हा हल्ला झाला होता.  प्रज्ञा सातव यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.