Sorghum Drip irrigation : फळांसह भाजीपाला तरकारी पिकांना ठिबक सिंचनचा वापर केला जातो. मात्र, अलीकडच्या काळात सर्वच पिकांना ठिबक सिंचन (Drip irrigation) पद्धतीचा वापर केला जात आहे. आता ज्वारी (sorghum) पिकालाही ठिंबक सिंचन केलं जात आहे. उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरुड (Pathrud) शिवरातील अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीला ठिबक सिंचन केलं आहे. हे दिलासादायक चित्र आहे. यामुळं पाण्याची बचत होत असून, कमी श्रमात सर्व ज्वारीला सारखे पाणी मिळत आहे. त्यामुळं ज्वारीचं जोमदार उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे.


भूम तालुक्यातील पाथरुड शिवार हा एक ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. या शिवारात हजारो हेक्टरवर ज्वारीचा पेरा केला जातो. यासाठी या शिवारात सिंचन करण्यासाठी छोटे मोठे तलाव आणि विहिरींचा वापर होतो. परंतु ज्वारी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना या भागात पाणी कमी पडते. कारण या भागात मोठा तलाव नसल्यानं पाणी मोजकेच उपलब्ध आहे. म्हणून भाजीपाला पिकांसाठी पूर्वी ठिबक सिंचनचा वापर केला जात होता. परंतु ज्वारीसारख्या पिकालाही पाथरुड शिवारातील शेतकरी ठिबक सिंचनचा वापर पाणी देण्यासाठी करू लागलेत. 


कमी पाण्यात पीक जोमात


पाथरुड शिवारात अगदी शेकडो एकरवर शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर सुरू केला आहे. यामुळं कमी पाण्यात कमी श्रमात ज्वारीचे पीक हे ओलिताखाली आणणे शेतकऱ्यांना सहज शक्य होऊ लागले आहे. ठिबक सिंचन पद्धतीनं ज्वारी पिकास पाणी एकसारखे मिळू लागल्यानं ज्वारीच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. 


ज्वारीला शेतकरी ठिबक सिंचनचा वापर नेमका कसा करतात


ज्वारी हे पीक पेरणी केलेले पीक असल्यानं शेतकरी यामध्ये ठिबक सिंचनचा वापर दोन ठिबक सिंचन ओळी मधील अंतर सरासरी साडेतीन ते चार फूट इतके ठेवतात. सव्वा ते दीड फूट इनलाईन ठिबक सिंचनचा वापर करण्यात येतो. या पद्धतीनं ठिबक संच चालू करुन पूर्ण क्षेत्र ओले होईपर्यंत चालू ठेवले जाते. त्यानंतर ज्वारीच्या गरजेनुसार परत पाणी दिले जाते. यामुळं रात्री अपरात्री ठिबक सिंचन केलेल्या शेतकऱ्यांना उभे राहून पाणी देण्याची गरज लागत नाही. ठिबक सिंचनामुळं सर्व ठिकाणी समान पाणीही पोहोचते. शेतकऱ्यांच्या श्रमातही बचत होते आणि उत्पन्नातही वाढ दिसून येते. 


ठिबक सिंचनासाठी 55 टक्क्यापासून 80 टक्क्यापर्यंत अनुदान


शेतकऱ्यांना ठिबक सिंचन घेण्यासाठी शासनाकडून 55 टक्क्यापासून 80 टक्क्यापर्यंत अनुदान दिले जाते. यामुळं अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात शेतकरी ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करत आहेत. यामुळं शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना पाणी देणे सुखकर होऊ लागले आहे. ज्वारी या पिकाला ठिबक सिंचनचा वापर केल्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ होत आहे. शिवाय ज्वारीचे पीक भिजवण्याचे श्रमही कमी होते. एकंदरीतच ठिबक सिंचन चांगला फायदा होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nandurbar News : नंदूरबार बाजार समितीत 'ज्वारी' तेजीत, मिळतोय आत्तापर्यंतचा सर्वाधिक दर, शेतकरी समाधानी