Osmanabad News: उस्मानाबादमधील (Osmanabad) उरुसात वळू (Bull) उधळल्यानं चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे घडलेल्या घटनेत 14 भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपार सुरू आहेत. 


उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे (Dargah Hazrat Khwaja Shamsuddin Gazi Rehmatullah Alaihi) यांच्या उरुसाच्या धार्मिक कार्यक्रमावेळी अचानक वळू उधळला आणि मोठी चेंगराचेंगरी झाली. पहाटे घडलेल्या घटनेत 14 भाविक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात (Osmanabad District Government Hospital) उपचार सुरू आहेत.


पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी जवळपास 15 हजार भाविक उपस्थित होते, अचानक वळू उधळल्यानं मोठी धावपळ झाली आणि नागरीक भयभीत होऊन पळू लागले आणि चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण 14 भाविक जखमी झाले आहेत. पोलीस आणि वैद्यकीय पथक तात्काळ हजर झाल्यानं गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.


पाहा व्हिडीओ : उस्मानाबादमधील  उरुसात वळू उधळल्याने चेंगराचेंगरीची घटना घडलीये, पहाटे घडलेल्या घटनेत 14 भाविक जखमी



कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उरुस झाला नव्हता. आता अखेर कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर यंदाच्या वर्षी उरुस काढण्यात आला होता. सर्वधर्मियांचा हा महत्त्वाचा उरुस आहे. हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या धार्मिक सोहळ्यानिमित्त उस्मानाबादमध्ये हा उरुस असतो. दोन ते तीन दिवस हा उरुस चालतो. रात्रभर या उरुसात सहभागी होण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. आज पहाटे उरुस सुरू होता. अनेक भाविक उरुसात सहभागी झाले होते. अशातच आज पहाटेच्या वेळी अचानक एक वळू या गर्दी घुसला. 


अचानक वळू गर्दीत घुसल्यानं भाविक भयभीत झालेच, पण वळूही घाबरुन सैरावैरा पळू लागला. वळू उधळल्यानं सर्व भाविक भयभीत होऊन पळू लागले. गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण 14 भाविक या घटनेत जखमी झाले आहेत. तर यापैकी काही भाविकांना गंभीर दुखापतही झालेली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवलं. तसेच, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी काहीजणांवर उपचार सुरु आहेत. तर काहीजण उपचार घेऊन घरी परतले आहेत.