Osmanabad News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कुऱ्हाडीने घाव घालत तिची हत्या करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. भुयार चिंचोली येथील एकास बुधवारी उमरगा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पत्नीची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  तर सबळ पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अर्जुन सुरवसे (वय 45 वर्षे) असे आरोपी पतीचे नाव असून, जोत्स्ना सुरवसे असे मयत महिलेचे नाव आहे. 


अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील चिंचोली येथील अर्जुन सुरवसे याच्यासोबत जोत्स्ना यांचा विवाह वीस वर्षापूर्वी झाला. लग्नानंतर सर्व काही सुरळीत सुरु होते. दरम्यानच्या काळात त्यांना भूमिका, मोनिका व अंकिता अशा तीन मुली झाल्या. पण पुढे अर्जुन सुरवसे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर घेऊ लागला. यामुळे दोघांमध्ये अनकेदा कुरबुरी व्हायची. मात्र पुढे चालून अर्जुन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्रास देऊ लागला. यातून जोरदार भांडण होऊ लागले. त्यामुळे जोत्स्ना यांनी कासारशिरसी पोलिस ठाण्यात पती अर्जुन सुरवसे विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून गुन्हाही दाखल झाला होता. हा खटला प्रलंबित असतानाच पती-पत्नीत तडजोड झाली. यानंतर जोत्स्ना चिंचोली (भुयार) येथे नांदण्यास गेली होती. 


रात्रीच्या सुमारास केली हत्या... 


पोलिसातील दाखल झालेला गुन्हा मागे घेतल्यावर जोत्स्ना पुन्हा सासरी आल्या. पण त्यानंतरही जोत्स्ना यांच्या चारित्र्यावर संशय घेणे थांबले नाही. यातूनच पती अर्जुनने राहत्या घरात 22  सप्टेंबर 2020 च्या रात्री 9 ते 2 वाजण्याच्या दरम्यान जोत्स्नावर कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर जोत्स्नाचा भाऊ राम मनोहर कांबळे यांनी उमरगा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पती अर्जुनसह तिची बहीण विनंता विलास सूर्यवंशी व विलास नामदेव सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. 


न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा


पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण न्यायालयासमोर चालले असता, समोर आलेले साक्ष, पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुषमा घोडके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुनावणीदरम्यान, फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी मुलगी मोनिका अर्जुन सुरवसे, राम कांबळे, शेजारी हिराजी दासिमे तसेच तपासिक अंमलदार तथा सहायक पोलिस निरीक्षक वाय. व्ही. बारवकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तर सबळ पुराव्या अभावी विनंता सूर्यवंशी व विलास सूर्यवंशी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


हरकती न मागवता औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय कसा झाला; न्यायालयाची शासनाला विचारणा