Health News: सध्या वातावरणात सातत्यानं बदल  (Climate change) होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदल्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम (Impact on health) होताना दिसत आहे. नागरिकांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे. उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील रुग्णालये सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णांनी भरून गेल्याचे चित्र आहे. तसेच लहान मुलांना देखील सर्दी ताप खोकल्याचा त्रास होताना दिसत आहे.


वातावरणात लक्षणीय बदल


सध्या राज्यभरामध्ये वातावरणामध्ये लक्षणीय बदल होत आहे. गेल्या चार दिवसांपासून अचानकच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळं पहाटेच्या वेळेला कडाक्याची थंडी तर सकाळी अकरानंतर सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हामुळं थोडासा उकाडा जाणवत आहे. त्यामुळं खासगी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयात सर्दी, ताप, दमा आणि खोकला या आजाराच्या रूग्णांनी भरून गेली आहेत. विशेषत: बालरोगतज्ञांकडे सध्या मोठी गर्दी दिसत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा वयोवृद्ध नागरिकांची गर्दी दिसत आहे. उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालय रुग्णांनी भरून गेल्याने तपासणीसाठी रांगा दिसत आहेत. दरम्यान, बदलत्या वातावरणात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.


पुढच्या तीन ते चार दिवसात विदर्भात थंडीचा जोर वाढणार 


विदर्भात थंडीचा जोर कमी झाला आहे. तसेच राज्यातील बहुतांश ठिकाणी देखील थंडी कमी झाली आहे. येणाऱ्या तीन चार दिवसात विदर्भासह सर्वत्र थंडी वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्यापासून विदर्भासह अनेक ठिकाणी किमान तापमान लक्षणीयरित्या कमी होईल. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला चक्रवादळ आता तामिळनाडू आणि कर्नाटक ओलांडून कमकुवत होऊन अरबी समुद्रात स्थिरावले आहे. दिवसागणिक त्याची ताकद आणखी कमी होत असून येणाऱ्या काही दिवसात हा चक्रवात आणखी कमकुवत होईल. तेव्हा पुन्हा एकदा वाऱ्यांची दिशा बदलेल आणि उत्तरेकडून थंड व कोरडे वारे दक्षिणेकडे वाहू लागतील. वाऱ्यांची दिशा बदलताच थंडी तीव्रतेने वाढत जाईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


तापमान पाच ते सात अंशांनी जास्त


सध्या विदर्भासह महाराष्ट्रात सर्वत्र किमान तापमान सामान्यपेक्षा पाच ते सात अंश जास्त आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमान सामान्य पातळीवर पोहोचून थंडी तीव्रतेने वाढत जाईल असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Mango farmers : बदलत्या वातावरणाचा हापूसला फटका, आंब्याची फळ प्रक्रिया विस्कळीत; लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात