Marathwada Farmer Suicide: मराठवाड्यात शेती पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा यासह इतर कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारच्या पाच महिन्याच्या काळात मराठवाड्यातील 475 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांतच मराठवाड्यातील तब्बल 939 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपविली आहे. तर गतवर्षाअखेर ही आकडेवारी 887 एवढी होती. परंतु हा आकडा यंदा नोव्हेंबरमध्येच पार झाला आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दरवर्षीच खरीप आणि रब्बी हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. यावर्षी देखील अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे संकटात सापडलेला शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यंदाही विभागात 11 महिन्यांत विभागात 939 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गतवर्षी डिसेंबरअखेर विभागात 887 आत्महत्या होत्या. त्याअगोदर 2020 मध्ये 773 आत्महत्या होत्या. परंतु यावर्षी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत प्रचंड वाढ झाली आहे. मराठवाड्यात यंदा सर्वाधिक 249 आत्महत्यांच्या घटना एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. तर 939 पैकी 722 आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. तर 123 आत्महत्या अपात्र ठरल्या असून, उर्वरित 94 प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये 475 शेतकऱ्यांची आत्महत्या
गेल्या अकरा महिन्यात मराठवाड्यातील तब्बल 939 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली असून, यातील 475 शेतकऱ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात आत्महत्या केल्या आहेत. ज्यात जुलै महिन्यात 83 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, ऑगस्ट महिन्यात 123, सप्टेंबर 96, अक्टोबर 94 आणि नोव्हेंबर महिन्यात 79 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
आत्महत्या आकडेवारी (जानेवारी ते नोव्हेंबर 2022 पर्यंत)
महिना | आत्महत्या संख्या | पात्र | अपात्र |
जानेवारी | 59 | 52 | 7 |
फेब्रुवारी | 73 | 63 | 10 |
मार्च | 101 | 89 | 12 |
एप्रिल | 47 | 38 | 9 |
मे | 76 | 69 | 6 |
जून | 108 | 84 | 21 |
जुलै | 83 | 63 | 17 |
ऑगस्ट | 123 | 90 | 26 |
सप्टेंबर | 96 | 73 | 10 |
अक्टोबर | 94 | 69 | 3 |
नोव्हेंबर | 79 | 32 | 2 |
एकूण | 939 | 722 | 123 |
कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या...( 11 महिन्यातील आकडेवारी)
मराठवाड्यात यंदा सर्वाधिक 249 शेतकरी आत्महत्या एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. त्याखालोखाल औरंगाबाद 161, जालना 115, नांदेड 140, उस्मानाबादेत 107, परभणी 67, लातूर 59 आणि हिंगोली जिल्ह्यातील 41 शेतकरी आत्महत्याच्या घटना घडल्याची आकडेवारी समोर आली आहे.