जळकोट, (उस्मानाबाद) : उस्मानाबाद हा खरंतर दुष्काळी भाग… मात्र, त्याच जमिनीतून एका शेतकऱ्यानं द्राक्षबाग फुलवली आहे. थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 60 एकरांवर. भेगाळ जमिनीतून नंदनवन फुलवणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा तुम्हालाही नक्कीच प्रेरणा देईल.

नजर जाईल तिथवर द्राक्षशेती. दहा-वीस नाही तर तब्बल 60 एकरावर. महाराष्ट्रातून विदेशात द्राक्षांची निर्यात करणारे आपण पहिले शेतकरी असल्याचा दावा त्र्यंबक फंड हे करतात.



फंड साहेबांच्या शेतात दीडशेहून अधिक मजूर काम करतात. त्यातले पन्नास साठ थेट बिहारहून आले आहेत.

सकाळी सहापासून लगबग सुरु होते. तुळजापूरपासून 27 किलोमीटरवर जळकोटवाडी नावाचं गाव आहे. फंड याच वाडीचे. वडिलोपार्जित जमीन फक्त 12 एकर होती. पण द्राक्षाच्या नफ्यातून गेल्या तीस वर्षात त्यांनी 125 एकर जमीन खरेदी केली आहे.

A

अगदी माळरानातले दगडगोटे बाजूला सारुन त्यांनी बाग फुलवली. द्राक्षबागेला पाणी मुबलक हवं. त्याचंही काटेकोर नियोजन केलं. अडीच कोटी लिटर क्षमतेची तीन आणि चार कोटी लिटर क्षमतेचं एक शेततळं याच्या साह्याने त्यांनी आपली द्राक्षबाग फुलवली. शिवाय 100 विंधन विहिरी आणि तीन मोठ्या विहिरी आहेत. तिथून 30 लाख लिटर क्षमतेच्या हौदात पाणी टाकलं जातं. दर दोन वर्षानं दुष्काळाचा फेरा येतो. 2015-16 मध्ये टँकरनं पाणी आणून बाग वाचवली. त्यासाठी तब्बल 75 लाख रुपये खर्च झाला.

फंड यांनी 84 साली पहिल्यांदा 2 एकरावर द्राक्षबागेला सुरुवात केली. एकरी 12 टन उतारा पडला. पहिल्याच वर्षी द्राक्षं विदेशात गेली. दुसऱ्या वर्षी हे प्रमाण दुप्पट झालं. उत्साह वाढला. क्षेत्र आणि कष्टाचा मेळ बसला. आता साठ एकरातून 400 टन द्राक्षाची निर्यात होईल असा अंदाज आहे.



शेतीनं फंड कुटुंबाला समृद्ध केलं. एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. तो अमेरिकेत स्थायिक झाला. दोन मुलं द्राक्षबागेत राबतात.

तासगणेश, फ्लेम, फँटसी, सुपर सोनाका, माणिकचंद, शरद, सरिता, नाना पर्पल, अशा 20 वेगवेगळ्या जातीची द्राक्षं फंड यांच्या शेतात आहेत. भारतीय बाजारात जिथं 35-40 रुपयाचा दर आहे, तिथं फंड यांच्या द्राक्षांना विदेशात 80 ते 90 रुपयाचा भाव मिळतो.



शेती कठीण धंदा आहे. तिथं अनिश्चितता आणि धोका अधिक आहे. पण कष्ट आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं तर कमाल होऊ शकते, याचं हे जिवंत उदाहरण.

VIDEO :