नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतील पश्चिम किनारपट्टीवरचं तेलाचं टँकर असणारं जहाज गायब झाल्याची माहिती मिळत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही यावृत्ताला पुष्टी दिली आहे.

मरिन एक्स्प्रेस हे जहाज मुंबईच्या अँग्लो ईस्टर्न कंपनीचं  आहे. या जहाजावर 22 भारतीय नागरिक होते. गल्फ ऑफ गिनी या ठिकाणाहून हे जहाज गायब झाल्याचं सांगितलं जात आहे.

गुरुवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून या जहाजाशी कुठलाही संपर्क झालेला नाही. त्यामुळे जहाजाचं अपहरण झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. हे व्यापारी जहाज असून, जहाजाचा शोध सुरु आहे.

या जहाजाच्या गायब होण्याच्या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयानेही पुष्टी दिली असून, जहाजाच्या शोधासाठी नायजेरियन अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याबाबत ट्वीट करुन सांगितलंय की, “जहाजाचा शोध घेण्यासाठी आम्ही अबुजा (नायजेरिया)मधील बेनिन आणि नायजेरियन अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहोत. तसेच बेपत्ता भारतीय नागरिकांच्या माहितीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने एक हेल्पलाईनही सुरु केली आहे. + 235-9070343860 या क्रमांकावर संपर्क साधून, जहाजावरील बेपत्ता नागरिकांची माहिती मिळू शकेल.”