नवी दिल्ली :  निर्भया गॅंगरेप प्रकरणातील आरोपी पवन गुप्ताची फाशीपासून वाचण्याची धडपड पुन्हा एकदा वाया गेली आहे. सुप्रीम कोर्टाने बलात्कार आणि हत्येच्या वेळी तो अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळला आहे. कोर्टाने पवन आणि अन्य तीन आरोपींना 1 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता फाशीची शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. जस्टिस आर भानुमती यांच्या पीठासमोर आरोपी पवन गुप्ताच्या वकीलांनी दावा केला की, डिसेंबर 2012 मध्ये हा गुन्हा करतेवेळी पवन हा अल्पवयीन होता. हायकोर्टाने चुकीच्या पद्धतीने त्याची याचिका फेटाळली आहे. यावर न्यायाधीशांनी म्हटलं की, गुन्हा करतेवेळी आरोपीच्या अल्पवयीन असल्याबाबत सांगितलं नव्हतं असं सांगत ही याचिका फेटाळली. याआधी दिल्ली उच्च न्यायालयानेही पवनचा अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळला होता. तसंच वकिलांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता.


दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताच्या याचिकेवर (स्पेशल लीव्ह पिटीशन) आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. गुन्हा केला त्यावेळी आपलं वय 18 वर्षांपेक्षा कमी होतं आणि अल्पवयीन होतो, असा दावा पवन गुप्ताने याचिकेत केला होता. दोषी पवन गुप्ताने सुप्रीम कोर्टात दिल्ली हायकोर्टाच्या 19 डिसेंबरच्या आदेशाला आव्हान दिलं होतं, ज्यात बनावट कागदपत्रे सादर करणं आणि कोर्टात हजर न राहण्याबाबत वकिलांना फटकार लगावली होती. पवन गुप्ताला सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळणार नाही, असं कायदेतज्ज्ञांचं मत आहे. सुप्रीम कोर्टानेही पवन गुप्ताची याचिका फेटाळली तर क्युरेटिव्ह पिटीशन आणि राष्ट्रपतींकडे दया अर्ज याचाही तो आधार घेऊ शकतो.



वकील एपी सिंह यांच्यावतीने दाखल केलेल्या याचिकेत पवन गुप्ताने दावा केला आहे की, 16 डिसेंबर 2012 रोजी केलेल्या गुन्ह्याच्या वेळी आपण अल्पवयीन होतो. शाळेच्या दाखल्यावर माझी जन्मतारीख 8 ऑक्टोबर 1996 आहे, असा दावा पवन गुप्ताने केला होता. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणीही त्याने याचिकेत केली होती.

1 फेब्रुवारीला फाशी?
दरम्यान निर्भयाच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी 1 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने या चौघांसाठी 1 फेब्रुवारीचा डेथ वॉरंट जारी केला आहे. याअंतर्गत मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि पवन गुप्ता या चारही दोषींना 1 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकवण्यात येईल. याआधी चारही जणांना 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार होती.

काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?

- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.
- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.
- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.
- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.
- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.
- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा अशी या चार दोषींची नावं आहेत. तर या प्रकरणातील राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होती. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन असल्याने, ज्युवेनाईल कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. 2015 रोजी त्याची सुटका झाली. त्यानंतर चारही दोषींनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने यांच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या होत्या.

संबंधित बातम्या 

Nirbhaya convict | फाशी टाळण्यासाठी निर्भया प्रकरणातील दोषीची सुप्रीम कोर्टात धाव | ABP Majha 

Nirbhaya Case | फाशी टाळण्यासाठी निर्भयाचा दोषी पवन गुप्ता सुप्रीम कोर्टात 

Special Report | निर्भयाच्या दोषींच्या फाशीवरून राजकारण, निर्भयाची आई निवडणूक लढणार 

निर्भया प्रकरणात फाशीची तारीख पुढे ढकलली, आता 1 फेब्रुवारीला दोषींना फाशी 

Nirbhaya Case | राष्ट्रपतींनी दोषी मुकेश सिंहच्या दयेचा अर्ज फेटाळला! 

तिहार जेलमध्ये निर्भयाच्या दोषींच्या फाशीची तालिम; 22 जानेवारीला देण्यात येणार फाशी