नवी मुंबई : निर्भया प्रकरणात फाशीची तारीख पुढे ढकलली आहे. आता चारही आरोपींना 22 जानेवारी ऐवजी आता 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, विनय शर्मा यांच्याविरोधात पटियाला हाऊस न्यायालयाने नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे. तब्बल सात वर्षांनंतर आता चारही आरोपींना फाशी देण्यात येणार आहे.


दोषींना जसं हवं आहे, तसंच होतं आहे. दोषींना लवकरात लवकर फाशी द्यावी, तारीख पे तारीख नको. आपली न्यायव्यवस्था अशी आहे की दोषींनी म्हणणं जास्त ऐकलं जात आहे, अशी नाराजी निर्भयाच्या आई आशा देवी यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत दोषींना फाशी दिली जात नाही, तोपर्यंत मला समाधान वाटणार नाही. मात्र मी आशा सोडणार नाही, असंही आशा देवी यांनी सांगितलं.





काय आहे निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण?


16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत निर्भया खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला बेदम मारहाण केली. त्यानंतर निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर तिच्यावर अत्याचारही केले. तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.


पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा अशी चार दोषींची नावं आहेत. या प्रकरणातील राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होती. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन असल्याने, ज्युवेनाईल कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. 2015 रोजी त्याची सुटका झाली. त्यानंतर चारही दोषींनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने यांच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या होत्या.


संबंधित बातम्या