जळगाव : बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी 2018 पासून पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असताना देखील त्‍यावेळी प्रकरण दडपण्यात आले. मात्र आता यातील सर्व सत्‍य बाहेर येणार असून, या प्रकरणात बड्या नेत्‍याचे नाव असून ज्‍याचा संबंध मंत्र्यांशी राहिला असल्‍याचा गौप्यस्‍फोट एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.  बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू असताना आज माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सदर प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या ॲड. किर्ती पाटील देखील उपस्‍थित होत्‍या.


खडसे यांनी सांगितले, की बीएचआरचा साधारण 1100 कोटी रूपयांचा घोटाळा आहे. याबाबत 2018 मध्ये ॲड. किर्ती पाटील यांनी राधा मोहन यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्‍यावेळी त्‍यांनी राज्‍य शासनाला सदर प्रकरणाची चौकशी इओडब्‍ल्‍यू यांच्या मार्फत करण्याचे आदेश काढले होते. मात्र या प्रकरणाची चौकशीत पुण्यात राजकीय व्यक्‍तीकडून दबाव आणण्यात आल्‍याने तात्‍पुरती स्‍वरूपाची चौकशी झाल्‍याचे दाखवून प्रकरण दडपण्यात आले. इतकेच नाही, तर त्‍यावेळी विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी देखील बीएचआरचे अवसायक असलेले कंडारे यांच्याकडे माहिती मागितली होती. मात्र त्‍यांनी दिली नाही. पण बीएचआरची प्रॉपर्टी कमी किंमतीत घेतल्‍याचे खडसे यांनी सांगितले


बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी झालेल्‍या चौकशीदरम्‍यान सापडलेल्‍या कागदपत्रांमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटरपॅड आढळून आले आहे. याबद्दल बोलताना खडसे म्‍हणाले, की कोणाचे लेटरपॅड सापडले म्‍हणून त्‍याचा प्रकरणाशी संबंध येतो असे होत नाही. कारण कोणी चोरून देखील लेटर पॅड नेवू शकतो.


गिरीश महाजन यांनी या प्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता . त्यावर एकनाथ खडसे यांनी नुसता तोंडी बोलणं उपयोग नाही . पूराव्या शिवाय मी बोलत नाही. अशी प्रतिक्रिया देत कुठलेही पुरावे नसताना माझ्यावरती ही आरोप करण्यात आले होते. अनेक वर्ष माझावर अन्याय करण्यात आला. मी पुराव्याशिवाय आरोप करत नसल्याचे एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.


काय आहे प्रकरण?


बीएचआर क्रेडिट सोसायटीमधील अपहार प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडल्याचं पाहायला मिळालं आहे. देशभरात सात राज्यात या संस्थेच्या 264 शाखा असून 28000 हजार ठेवीदारांच्या 1100 कोटी रुपयांच्या ठेवी यामध्ये अडकून पडल्या आहेत. मुदत संपल्यावर देखील ठेवींच्या रकमा परत मिळत नसल्याने हा घोटाळा 2015 ला खऱ्या अर्थाने समोर आला होता. यावेळी भाईचंद हिराचंद संस्थेच्या तेरा संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तेव्हापासून ते आजपर्यंत सर्व संचालक हे कारागृहाताच आहेत. याच काळात ठेवीदारांच्या ठेवी ठेवीदारांना परत करता याव्या यासाठी शासनाने या पतसंस्थेवर जितेंद्र कंदारे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली होती. या अवसायकन भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या मालमत्ता लिलावात विकून त्यातून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांच्या ठेवी परत करणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता या मालमत्ता काही ठराविक लोकानांच अतिशय कमी किंमतीत मातीमोल भावात विकल्या गेल्या होत्या. या मालमत्ता विक्री बाबतही सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के तयार करून बनावट दस्ताऐवज बनवले गेल्याचा पोलिसांना संशय आहे. शिवाय ठेवीदारांच्या ठेवी परत करताना त्यांच्या मूळ रकमे पेक्षा कमी रक्कम देऊन उर्वरित रक्कमेचा अपहार करण्यात आल्याच्या तक्रारी ठेवीदारांकडून करण्यात येत होत्या. अशाच प्रकारच्या तक्रारी या पुणे जिल्ह्यात पोलिसांकडे दाखल झाल्याने त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी हे कारवाई सत्र सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.


भाईचंद हिराचंद रायसोनी पत संस्थेतील आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती ही मोठी असल्याच्या कारणाने पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अतिशय गोपनीयता राखत जळगाव शहरातील एकूण बारा ठिकाणी एकाच वेळी छापमारी करत खळबळ उडवून दिली आहे. गेल्या चार दिवसपासून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे 135 कर्मचारी हे या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 100 हून अधिक जणांची चौकशी केली आहे. तर पाच जणांना अटक केली आहे. या घटनेत गिरीश महाजन यांचे मित्र सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंदारे हे प्रमुख संशयित असून ते फरार होण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र या घोटाळ्यात त्यांना सहकार्य करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा सहभाग आणि शोध घेतला जात आहे.

या घटनेत पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाने एकाच वेळी गिरीश महाजन यांचे समर्थक असलेल्या सुनील झंवर यांच्यावर मुख्यतः लक्ष केंद्रित केल्याच पाहायला मिळत असून त्यांच्या घराच्या सर्व आस्थापनांवर छापेमारी करत शोध मोहीम सुरू केली आहे. सुनील झंवर यांच्याकडे घेण्यात आलेल्या झडतीमध्ये पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी या आढळून आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के, बनावट दस्ताऐवज आणि कागदपत्र, माजी मंत्री गिरीश महाजन यांचं लेटर हेड अनेक कॉम्प्युटर, एटीएम कार्ड अशा प्रकारचे ट्रक भर पुराव्यासाठी लागणारे साहित्य जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी अपहार प्रकरणात आता राजकीय वळण मिळत असल्याच पाहायला मिळत आहे कारण सुनील झंवर हे भाजप चे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अतिशय निकटचे मानले जातात. त्यांचा ह्या घोटाळ्यात समावेश असलायने गिरीश महाजन यांची मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांनी ही गिरीश महाजन यांना कोंडीत पकडण्याची ही चांगली संधी असल्याने त्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सुनील झंवर यांच्याकडे केलेल्या छापमारीत गिरीश महाजन यांचं लेटर हेड आढळून आल्याने गिरीश महाजन यांची यामध्ये काही भूमिका आहे का? अशा प्रकारच्या चर्चा आता राजकीय क्षेत्रात होताना दिसून येत आहेत.