IND vs AUS : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. लागोपाठ दोन एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यानंतर मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला पुन्हा एकदा टीकेचा सामना करावा लागत आहे. माजी क्रिकेटर गौतम गंभीरने विराट कोहलीवर टिकास्त्र डागलं आहे. गौतम गंभीरचं म्हणणं आहे की, त्याला विराट कोहलीचं कर्णधारपद समजत नाही.


रविवारी खेळवण्यात आलेला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 390 धावांचं आव्हान भारतासमोर ठेवलं होतं. भारतीय संघ 50 ओव्हर्समध्ये केवळ 338 धावाच करू शकला. त्यामुळे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन सामने आपल्या खिशात घालत ऑस्ट्रेलियाने ही मालिका जिंकली आहे. भारतीय संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यातही 66 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.


गौतम गंभीरने दोन ओव्हर्सनंतर बुमराहला गोलंदाजीवरून हटवल्यावरून विराटला फटकारलं आहे. गौतम गंभीर म्हणाला की, "कर्णधार म्हणून विराट कोहली मला समजतंच नाही. विकेट घेणं किती महत्त्वाचं असतं, हे आपण सर्वांनाच माहिती आहे. जर तुम्ही संघातील सर्वोत्तम गोलंदाजाला बाजूला केलं तर कसे चालेल? बुमराहकडून 4-3-3 ओव्हर्सचा स्पेल करणं गरजेचं होतं."


गंभीर पुढे बोलताना म्हणाला की, "तुम्ही तुमच्या गोलंदाजाला दोन ओव्हर्सनंतरच हटवलं. ही गोष्ट कशी समजून घेऊ. हे टी20 क्रिकेट नाही. जो निर्णय कर्णधार म्हणून तू घेतलास, तो अत्यंत चुकीचा होता." तसेच गौतम गंभीरने सहाव्या गोलंदाजाचा तिढा सोडवण्यासाठी सुंदर आणि शिवम दुबेला संधी देण्याचा पर्याय सुचवला आहे. गंभीर म्हणाला की, "शिवम दुबे आणि सुंदर उत्तम पर्याय ठरू शकतात. ते संघासोबत ऑस्ट्रेलियामध्येच आहेत. त्यामुळे त्यांना एकदिवसीय सामन्यात खेळण्यासाठी संधी दिली पाहिजे."


दरम्यान, गौतम गंभीरने याआधीही विराट कोहलीच्या कर्णधार म्हणून घेतलेल्या निर्णयांवर निशाणा साधला आहे. गंभीरने आयपीएलचं 13वं सीझन संपल्यानंतरही मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये विराट कोहलीऐवजी रोहित शर्माला कर्णधार करावं अशी मागणी केली होती.


महत्त्वाच्या बातम्या :