अहमदनगर : नक्षलवादी परके नाहीत, ते महाराष्ट्रात जन्मले, महाराष्ट्रातच राहतात. नक्षलवादाचा प्रश्न बंदुकीने संपणारा नाही. सरकारने चर्चेतून मार्ग काढावा. सरकारने बोलावलं तर मी मध्यस्थीसाठी तयार आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.



गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात पोलिसांचे 15 जवान शहीद झाले. यावर अहमदनगरमध्ये अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. हा प्रश्न बंदुकीने सुटणार नाही. यासाठी सरकारने नक्षलवाद्यांशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

इतकेच नाही तर सरकार नक्षलवाद्यांशी चर्चा करून मार्ग काढणार असेल तर आपण मध्यस्थी करण्यासाठी सहभागी होऊ असंही अण्णा हजारे म्हणाले. नक्षलवादी काही बाहेरचे नाहीत. त्यांचे प्रश्न समजून घेऊन सरकारने चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. त्यामुळे सरकारने बोलावलं तर मानवतेच्या धर्माने आपण मध्यस्थी करायला जाऊ, असं अण्णांनी म्हटलं आहे.

हल्ल्याने, बंदुकीने, गोळीबाराने प्रश्न सुटणार नाहीत. नक्षलवादी परके नाहीत. ते देखील महाराष्ट्रात जन्मले महाराष्ट्रात राहतात. त्यांनी केलेल्या हल्ल्यात जे जवान शहीद झाले तेही आपलेच. असं असताना बंदुकीने प्रश्न सुटणार नाहीत. सलोख्याने, चर्चेने हे प्रश्न सुटतील, असे अण्णांनी सांगितले.

गडचिरोलीमधील जांभूळखेडा येथे 1 मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात 15 पोलीस शहीद झाले. याप्रकरणी कंपनी चार टिपागड आणि कोरची दलमच्या नक्षलींविरोधात पुराडा पोलीस ठाण्यात हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कंपनी चारचा प्रभारी प्रभाकरसह इतर 40 अज्ञात नक्षलींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोलीच्या सी-60 पथकातील जवान खासगी वाहनाने जात असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. महाराष्ट्र दिनीच नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत मोठा घातपात घडवल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. गडचिरोलीतील कुरखेड्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ हा भूसुरुंग स्फोट झाला होता.