उमरेडच्या स्ट्रॉंगरुममधील 12 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीतील फूटेज असणारा सीसीटीव्ही यंत्रणेतील डीव्हीआर आणि दोन मॉनिटर चोरीला गेल्याचं उघड झालं होतं. मात्र आज सकाळी तो डीव्हीआर त्याच खोलीतील एका खुर्चीवर आणून ठेवल्याचं आढळलं. हा चोर कोण आहे, डीव्हीआरमधील सीसीटीव्ही फूटेज तसेच आहेत, की त्यासोबत छेडछाड झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
VIDEO | ..नाहीतर उमरेडमध्ये फेर मतदान घ्या, काँग्रेस उमेदवाराची मागणी | एबीपी माझा
रामटेक लोकसभेसाठी 11 एप्रिलला मतदान झालं. मतदानानंतर उमरेड विधानसभा क्षेत्रातील सर्व ईव्हीएम मशिन्स नियमानुसार उमरेडच्या तात्पुरत्या स्ट्रॉंगरुममध्ये गोळा करण्यात आली होती. 12 एप्रिलला संध्याकाळी सर्व ईव्हीएम नागपूरच्या मुख्य स्ट्रॉंगरुममध्ये पाठवण्यात आली. मात्र 12 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यानचे उमरेडच्या त्या स्ट्रॉंगरुममधील सीसीटीव्ही फूटेज असणारा डीव्हीआर चोरीला गेला.
डीव्हीआर म्हणजे काय?
डीव्हीआर म्हणजे डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर. डीव्हीआरच्या माध्यमातून सिक्युरिटी व्हिडिओ इमेजेस हार्ड डिस्कमध्ये साठवता येतात. डीव्हीआर हा अॅनलॉग सिग्नल्स डिजिटल स्वरुपात कन्व्हर्ट करतो. अनेक कॅमेरे एका डीव्हीआरशी जोडता येऊ शकतात. डीव्हीआरला साधरणतः 4, 8, 16 किंवा 32 कॅमेरा आऊटपुटसोबत जोडलं जातं.
डीव्हीआर चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला. चोरीला गेलेला डीव्हीआर शोधा, नाहीतर मतदारसंघात फेरमतदान घ्या, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी केली आहे. चोरीला गेलेल्या डीव्हीआर संदर्भात एफआयआर दाखल करुन ते तात्काळ शोधण्याची मागणी त्यांनी केली होती.