पंढरपूर : राज्यात 8 लाख जनावरे सरकारी छावण्यात दाखल झाली आहेत. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी सरकार तिजोरी रिकामी करणार असल्याचे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले आहे. जानकर यांनी सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी ते बोलत होते.


राज्यातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार पैसा कमी पडू देणार नाही. प्रसंगी तिजोरी खाली करण्याची सरकारची तयारी असल्याचे जानकर यांनी सांगितले. दुष्काळी पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने आज जानकर यांनी सांगोला तालुक्यातील विविध चारा छावण्यांमध्ये जावून शेतकऱ्यांशी चर्चा केली.

जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्यामध्ये तीन किलोने वाढ केल्याचे सांगत जनावरांच्या संख्येबाबत आणि इतर जाचक अटी देखील शिथिल केल्या जाणार असल्याचे संकेत जानकर यांनी दिले. गेल्यावेळी छावण्यात झालेले गैरप्रकार टाळण्यासाठी संपूर्ण डिजिटलायझेशन केल्याचा दावा जानकर यांनी केला आहे.

राज्यात एकूण 1 कोटी 12 लाख पशुधन असून सरकारने सुरु केलेल्या 1248 छावण्यामध्ये 8 लाख जनावरे दाखल झाल्याचे जानकर यांनी सांगितले. पशुपालकांच्या मागणीनुसार प्रती जनावर 15 ऐवजी आता 18 किलो चारा देण्यात येणार आहे. तर जनावरांना बॅच मारण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतलेले सहा रूपये देखील परत करण्यात येणार आहेत. या शिवाय जनावरांचा विमा देखील सरकार काढणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.

राज्यातील लोकसभेचा निकाल काय असेल असे विचारले असता, माढा, बारामती आणि सांगलीसह किमान 42 जागांवर भाजप शिवसेना जिंकेल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.