Navi Mumbai News : गेल्या 15 ते 20 वर्षांपासून रस्ता बनावा अशी मागणी करणाऱ्या खारघरवासियांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. याचं कारण ठरलं डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांचा महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्काराने होणारा सन्मान सोहळा. या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खारघरमध्ये येणार आहेत. यावेळी कोणतीही गैरसोय होऊ नये कोपरा गावासमोर मोठा रस्ता तयार करण्यात आला आणि तोही एका दिवसात. त्यामुळे जो रस्ता 15 ते 20 वर्षात बनला नाही, तो मंत्र्यांच्या कृपेने अवघ्या एका दिवसात बनल्याने खारघरवासियांचं नशीबच पालटलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
16 एप्रिल रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषणने सन्मान
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असून नवी मुंबईतील खारघर (Kharghar) येथे मोठा सोहळा होणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे.
महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार 2022 या वर्षासाठी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचा वितरण सोहळा येत्या रविवारी म्हणजे, 16 एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता खारघरच्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर संपन्न होईल.
पनवेल महापालिकेने एका दिवसात मोठा रस्ता तयार करण्याची किमया साधली!
या पुरस्कार सोहळ्याला लाखोच्या संख्येने सदस्य येणार असल्याने वाहनांची कोंडी होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. यासाठी खारघरमधून सायन पनवेल हायवेवर (Sion Panvel Highway) बाहेर पडता यावं म्हणून कोपरा गावासमोर मोठा रस्ता तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या 15 ते 20 वर्षे झाली जो रस्ता बनला नाही तो एका दिवसात तयार करण्याची कमाल पनवेल महानगरपालिकेने (Panvel Municipal Corporation) केली आहे. हा रस्ता बनावा यासाठी खारघरवासीय 20 वर्षांपासून मागणी करत आहेत. त्यांच्या या मागणीकडे पनवेल महानगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. मात्र आता मंत्रिमंडळ खारघरमध्ये येत असल्याने एकाच दिवसात मोठा रस्ता तयार करण्याचे मोठं काम पनवेल महानगरपालिकेने केले आहे.
हेही वाचा