Navi Mumbai MNS Agitation : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) नवी मुंबईत (Navi Mumbai) आज (12 एप्रिल) सिडकोविरोधात (CIDCO) भीक मांगो आंदोलन केलं. सिडकोच्या अत्यल्प उत्पन्न गटातील घराच्या किंमती कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मनसेने आज सीवूड्स इथे सिडकोच्या नावे रहिवाशांसोबत आंदोलन केले.


ग्राहकांचा आरोप काय?


सिडकोने 2022 मध्ये दिवाळी गृहनिर्माण लॉटरी काढली होती. यामध्ये उलवामधील खरकोपर बामन डोंगरीच्या घरांचा समावेश आहे. सिडकोने यात आर्थिक दुर्बल घटक (EWS) वर्गात जी घरे बांधली आहेत त्यांच्या किमती ग्राहकांच्या आवाक्या बाहेर आहेत. त्यामुळे या घराच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी ग्राहक करत आहेत. सिडकोने पंतप्रधान आवास योजनेत घरे बांधताना याच्या किंमती 18 ते 20 लाख रुपयांपर्यंत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सिडकोने अचानक घराच्या किंमती 35 लाखांपर्यंत वाढवल्या आहे. यामुळे आर्थिक दुर्बल घटकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख असून त्यांना एवढे कर्ज उपलब्ध होत नसल्याने हे घर घेणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर सिडकोने जाहिरात देताना घराचे चटई क्षेत्र 322 एवढे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात इरादा पत्रात 290 एवढेच चटई क्षेत्र दिले असल्याने सिडकोने फसवणूक केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.


मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : मनसे


यानंतर मनसेने या प्रकरणात उडी घेतली. यासाठी मनसेचे नेते गजानन काळे यांनी आज सीवूड्स इथे सिडकोविरोधात रहिवाशांबरोबर भीक मांगो आंदोलन केलं. घरांच्या किंमती वाढवल्याने गोरगरिबांनी घरे घ्यायची कशी असा सवाल उपस्थित करत याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


सिडकोत कंत्राटी कामगारांच्या नावाने बोगस पगार घोटाळा


एकीकडे सिडकोने अत्यल्प उत्पन्न गटातील घरांच्या किंमती वाढवल्याचा आरोप होत असतानाच दुसरीकडे सिडकोमध्ये कर्मचारी घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. कंत्राटी कामगाराच्या नावाने बोगस पगार घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. 2017 पासून 14 कामगार कामावर असल्याचे दाखवत त्यांच्या नावाने पगार घेण्यात आला. आयसीआयसीआय बॅंकेत या 14 कामगारांच्या नावाने खातेउघडले होते. साधारण 40 ते 50 हजार रुपये पगार होता. सिडकोच्या सर्वच खात्यात समन्वयक अधिकारी नावाने हे 14 कामगार काम करत असल्याचे दाखवण्यात आलं होतं. आतापर्यंत सुमारे 3 कोटी रुपयांपर्यंत पगार लाटल्याचे उघड झालं आहे. या प्रकरणी सिडको विझिलन्स विभागाकडून तपास सुरु आहे. दरम्यान या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.