Panvel News : पनवेल महानगरपालिकेच्या (Panvel Municipal Corporation) मालकीचे असलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे (Phadke Natyagruh) नशीब भाजपच्या अधिवेशनामुळे (BJP) पालटलं आहे. फडके नाट्यगृहात भाजपने राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केल्याने गेल्या चार दिवसात नाट्यगृह पूर्णपणे टकाटक करण्यात आलं आहे. तुटलेले नळ, फाटलेले छत, तडा गेलेल्या काचा, अस्वच्छ खुर्च्या याचे स्वरुप बदलून सर्व काही चकाचक करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी भिंतीवर आकर्षक डिझाईन लावण्यात आल्याने हेच का ते फडके नाट्यगृह असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडातून आपोआपच 'काय त्या भिंती...काय त्या काचा...काय ती स्वच्छता आणि काय ते चित्रांचा नजारा...ओकेमध्ये सगळं' उद्गार बाहेर पडत आहेत.
पनवेल महापालिकेच्या नाट्यगृहाची महापालिकेकडून देखभाल दुरुस्ती केली जात असली तरी अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. अवघ्या काही वर्षांतच नाट्यगृहाचे नाविन्य जुने झाल्यामुळे नाट्यरसिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असते. महापालिकेकडून नाट्यगृहाची डागडुजी केली जाते. परंतु ती वरवरची असल्यामुळे देखभाल दुरुस्ती केल्याचे लक्षातही येत नाही. नाट्यगृहाच्या लोकार्पणाला बसवण्यात आलेले बाथरुममधील ऑटोमॅटिक नळ बंद झाले होते. याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी बंद फिल्टर, खराब झालेल्या खुर्च्या, बंद पडलेले लाईट, खराब दरवाजे, खराब झालेली पीओपी, विस्कटलेली फ्लोअर मॅट आदींसह नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा देखील खराब झालेली होती. नाट्यगृहातील या तक्रारी वर्षांनुवर्षे जैसे थे होत्या. परंतु मागील चार दिवसांत अत्यंत वेगाने सूत्रे हलली आणि नाट्यगृहात नव्हत्याचं होते झाले.
प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक निश्चित होताच महापालिका प्रशासनाचा वेग प्रचंड वाढला आणि अवघ्या चार दिवसांत नाट्यगृह नवे झाले. बिघडलेले सगळे नळ दुरुस्त झाले आहेत, फुटलेल्या काचा दुरुस्त केल्या आहेत, खराब झालेल्या भिंतींना रंगरंगोटी करुन नव्या केल्या आहेत, भगव्या रंगाचे कॉलम पुन्हा रंगवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पाच वर्षांहून अधिक काळापूर्वी फोमिंग मशिनने स्वच्छ केलेल्या नाट्यगृहातील सव्वा सहाशे खुर्च्या स्वच्छ करण्यात आल्या आहेत. सर्व फ्लोअरची डागडुजी केली आहे. ग्रीन रुम, व्हीआयपी कक्ष आदींमधील लहान लहान त्रुटींची देखील दुरुस्ती करण्यात आली. तुटलेल्या फरशा बदलण्यात आल्या. बंद असलेले सर्व दिवे बदलण्याचे काम शुक्रवारपर्यंत वेगाने सुरु होते. कॅन्टीनमधल्या भिंतीवर पहिल्यांदाच आकर्षक चित्र काढण्यात आले आहेत. हे सगळं चित्र जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे बदलल्यामुळे सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या निमित्ताने का होईना नाट्यगृहाचे रुपडे पालटल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.