Shinde Group vs Ganesh Naik : नुकतेच सरकार स्थापन झाले असताना शिंदे गटाचे नगरसेवक पळवून गणेश नाईक यांनी राजकीय अपरिक्वता दाखवली, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नवी मुंबईतील प्रमुख विजय चौगुले यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीत एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येण्याची चिन्हे दिसत असतानाच  नगरसेवक फोडणे योग्य नाही. त्यामुळे भविष्यातील आम्ही दिलेले धक्के गणेश नाईक यांना भारी पडतील, असा इशारा शिंदे गटाकडून देण्यात आला आहे.


वर्षभरापूर्वी भाजपाचे असलेले तीन नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता परत एकदा घरवापसी करत या तीन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.


भाजप आमदार गणेश नाईक यांनी शिंदे गटाचे तीन माजी नगरसेवक गळाला लावल्याने नवी मुंबईत एकनाथ शिंदे गट विरुद्ध गणेश नाईक असा संघर्ष पेटला आहे. आमदार गणेश नाईक यांनी काल (19 जुलै) एकनाथ शिंदे गटाच्या तीन माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता. सरकारमध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदे गट एकत्र असताना नवी मुंबईत मात्र दोघांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या मर्जीतील तीन माजी नगरसेवक भाजपमध्ये, आमदार गणेश नाईक यांचा शिंदे यांना दे धक्का


तीन माजी नगरसेवक भाजपमध्ये
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेला अनेक धक्के बसले आहेत. आमदार, खासदारांपाठोपाठ अनेक ठिकाणचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु याच वेळी शिंदे यांच्या मर्जीतील शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांनी घरवापसी करत भाजपमध्ये प्रवेश केला. ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते या तीन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिघा विभागात प्राबल्य असलेले गवते परिवार एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील नगरसेवक होते. गणेश नाईक यांनी या तीन नगरसेवकांना भाजपात घेत एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे गट एकत्र आल्यानंतर ही पहिलीच घटना आहे.