Panvel Crime : पुण्यात डिलिव्हरी बॉयने (Delivery Boy) केलेल्या छेडछाडीचं प्रकरण तापलेलं असतानाच पनवेलमध्येही (Panvel) अशीच घटना घडली आहे. खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या एका कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. या घटनेनंतर आरोपी डिलिव्हरी बॉय घटनास्थळावरुन पसार झाला आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी डिलिव्हरी बॉयविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद रिजवान शेख असं या डिलिव्हरी बॉयचं नाव असून पोलीस या डिलिव्हरी बॉयचा कसून शोध घेत आहेत. त्याच्यावर याआधी गुन्हे दाखल आहेत का याचीही माहिती पोलीस घेत आहेत.
पार्सल देण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग
आरोपी डिलिव्हरी बॉयने खाद्यपदार्थ घरपोच केल्यावर रक्कम स्वीकारली. यावेळी घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केला. तरुणीच्या वक्षस्थळाला हात लावून या डिलिव्हरी बॉयने पळ काढला. पनवेलमधील कोन गावानजीक असलेल्या इंडियाबुल्स या इमारतीमध्ये संबंधित घटना घडली. विनयभंग झालेली तरुणी ही शिक्षण घेत असून तरुणीने तात्काळ घडलेल्या प्रसंगाची माहिती पोलिसांना दिली. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांना या प्रकरणी डिलिव्हरी बॉयचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित खाद्यपदार्थ घरपोच सेवा देणाऱ्या कंपनीकडून संबंधित डिलिव्हरी बॉयचा घरचा पत्ता शोधून काढण्यात आला. मात्र तो तिथूनही पसार झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी ग्राहकांना डिलिव्हरी बॉयकडून व्यवहार करताना सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे. तर डिलिव्हरी बॉयची नेमणूक करताना संबंधित कंपनी व्यवस्थापनाने सुद्धा त्या कामगारांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तपासून नंतरच त्यांना नोकरी दिल्यास अशा घटना रोखण्यास मदत होईल, असं पोलिसांनी म्हटलं.
पुण्यातही डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचं जबरदस्ती चुंबन
याआधी पुण्यातही असाच प्रकार समोर आला होता. कोंढवा परिसरात ही घटना घडली होती. खाद्यपदार्थाची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने पार्सल देण्याच्या बहाण्याने दोन वेळा चुंबन घेतल्याचा आरोप 19 वर्षीय तरुणीने केला होता. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.
संबंधित बातम्या