Zomato Delivery Boy Viral Video : बहुतेक जण घरबसल्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅपवरून चमचमीत अन्नपदार्थ मागवून आरामात खातात. या ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅपसाठी काम करणारे डिलिव्हरी बॉय ऊन, पावसाची पर्वा न करता जसे ऑर्डर मिळतात, तसे फटाफट डिलिव्हरी करण्यावर भर देतात. अनेक वेळेस हे डिलिव्हरी बॉय स्वत: उपाशी राहून दुसऱ्यांचं पोट भरण्यासाठी डिलिव्हरी करताना दिसतात. यांच्यासोबत जिव्हाळा तर सोडा काही लोक या डिलिव्हरी बॉयसोबत असभ्य वर्तन करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला झोमॅटो डिलिव्हरी बॉयला चप्पलनं मारहाण करताना दिसत आहे.


या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय उभा आहे. त्याच्या बाजूला उभी असलेली महिला या डिलिव्हरी बॉयला चप्पलनं मारहाण करताना दिसत आहे. शेजारी उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला डिलिव्हरी बॉयकडून त्याचं पार्सल हिसकावून घेत त्याला मारहाण करते. मात्र यामागचं कारण काही समजू शकलेलं नाही.


पाहा व्हायरल व्हिडीओ






नक्की काय आहे प्रकरण?


@bogas04 युजरने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, त्याने झोमॅटोवरून पार्सल मागवले होते. डिलिव्हरी बॉयकडून रस्त्यात एका महिलेने त्याच्याकडून पार्सल हिसकावून घेत त्याला चप्पलने जबर मारहाण केली. यानंतर डिलिव्हरी बॉय रडत रडत डिलिव्हरी करण्यासाठी आला आणि घडलेला प्रकार सांगितला. मारहाणीचा व्हिडीओ काही जणांनी चित्रित केला होता. पार्सल मागवणाऱ्या युजरने हा मारहाणीचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत या प्रकरणी डिलिव्हरी बॉयची मदत करण्याची आणि प्रकरणाची शहानिशा करण्याची मागणी केली.


झोमॅटोनं घेतली प्रकरणाची दखल


झोमॅटोनं या प्रकरणाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. चुकी कुणाचीही असो कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे मारणं आणि अशी वागणूक देणं फार चुकीचं असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.