Onion Rates Hike : महाराष्ट्रातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस (Rain) गेल्या काही दिवसात पडला असल्याने याचा परिणाम शेती पिकांवर झाला आहे. कांद्याचे नवीन आलेले पीक पावसात खराब झाल्याने राज्यातील कांदा (Onion) उत्पादन घटले आहे. याचा थेट परिणाम आवकीवर झाला असून नवी मुंबई (Navi Mumbai) एपीएमसी मार्केटमध्ये कांदा आवक कमी होऊ लागली आहे. दिवसाला सव्वाशे गाड्यांची आवक आता शंभरीच्या आत आली आहे. आलेला कांदाही भिजलेला असल्याने खराब झाला आहे. यामुळे कांद्याच्या दरात (Onion Rates) दुप्पट वाढ झाली आहे.
गेल्या महिन्यात 15 रुपयांपर्यंत मिळणारा कांदा आता घाऊक मार्केटमध्ये 30 ते 32 रुपये किलोवर गेला आहे. घाऊक मार्केटमध्ये कांद्याच्या किंमती वाढू लागल्याने किरकोळ मार्केटमध्ये 40 रुपयांवर कांदा पोहोचला आहे. येत्या दोन महिन्यात कांद्याचे नवीन पीक येण्याची शक्यता नसल्याने जानेवारीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
अतिवृष्टीमुळे कांद्याचं मोठं नुकसान
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. राज्यात चाळीत साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात आहे; परंतु परतीच्या पावसामुळे या कांद्याचे सुमारे 40 ते 50 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. शिवाय कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्यची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने कांद्याच्या पिकाला फटका बसला. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बाजारात येणारा कांदा खराब झाला. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त राहिल्यास दर वाढले आहेत.
कांदा आणखी महागण्याची चिन्ह
सप्टेंबरमध्ये लागवड केलेले कांद्याचे पीक पावसामुळे वाया गेल्याने आता डिसेंबरमध्ये नव्या कांद्याची आवक होणार आहे. त्यामुळे सुमारे दोन महिने वाढणारी मागणी पाहता कांदा आणखी महागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दर वाढण्याची शक्यता असून, आता सामान्यांनाही कांदा पुन्हा रडवणार असल्याचे चित्र आहे.