Navi Mumbai Crime : नवी मुंबईच्या कामोठे (Kamothe) हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी 17 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. आपल्या इंटरनेट वायफायचा (Wi-Fi) पासवर्ड शेअर करण्यास नकार देण्याच्या क्षुल्लक कारणावरुन या दोन तरुणांनी 17 वर्षीय मुलाला जीवे मारलं. ही घटना कामोठे सेक्टर 14 मध्ये 27 ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली.


रवींद्र अटवाल आणि राज वाल्मिकी अशी दोन्ही आरोपींची नावं असून ते सफाई कामगार म्हणून काम करतात तर मृत विशाल मौर्य हा बेकरीमध्ये काम करत होता. या प्रकरणी माहिती देताना कोमोठेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव म्हणाल्या की, "बेकरीमध्ये काम करणाऱ्या विशाल मौर्यच्या हत्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे."


वायफायच्या पासवर्डवरुन वाद
रवींद्र अटवाल आणि राज वाल्मिकी यांनी पहिल्यांदा विशालला मारहाण केली आणि मग त्याच्या पाठीत चाकू भोसकला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी विशालला जवळच्या एमजीएम रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी सांगितलं. दोन्ही आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. दोघांचा वायफायच्या पासवर्डवरुन विशालसोबत वाद झाला होता. या प्रकरणात एक पान दुकानाचा मालक साक्षीदार आहे. त्याने दोन्ही आरोपींना पाहिलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात पान दुकान मालकाला तक्रारदार केलं आहे.


दोन्ही आरोपींवर हत्येचा गुन्हा
कामोठे पोलिसांनी दोन्ही आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पनवेल कोर्टाने त्यांना 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी पुढे सांगितलं की, तक्रारदार पान दुकान मालकाने आपल्या जबाबात म्हटलं की, आपण रवींद्र आणि राज या दोन्ही आरोपींना ओळखतो, कारण हे दोघेही आपल्या दुकानात पान खाण्यासाठी आणि सिगरेट खरेदी करण्यासाठी येणारे नियमित ग्राहक आहेत.


घटनास्थळी नेमकं काय घडलं?
दुकान मालकाने पुढे सांगितलं की, मी 27 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता दुकानातच होतो. यावेळई रवींद्र आणि राज माझ्या दुकानाजवळच एका अज्ञात तरुणासोबत वादावादी करत होते. पहिल्यांदा दोघांनी या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारलं मग राजने त्याच्या पाठीवर चाकून वार केला. हा मुलगा खाली कोसळताच दोघांनीही तिथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा मुलगा उठला आणि काही अंतर चालल्यावर  तिथेच पुन्हा कोसळला आणि बेशुद्ध झाला. काही स्थानिकांनी जखमी मुलाला कामोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केलं, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.