Navi Mumbai shiv sena Latest News : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना घेवून बंडखोरी केल्याने आता इतर कार्यकर्तेही सेनेला जय महाराष्ट्र करू लागले आहेत. मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील ३२ नगरसेवकांनी जाहीर पाठिंबा दिला. या सर्व नगरसेवकांना शिंदे गटात घेवून जाणारे महानगर पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि उपनेते विजय नाहटा यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. दोघांना पक्षातून काढले असले तरी 32 नगरसेवकांवर मात्र अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. 


नवी मुंबई शहर हे 20 वर्षापूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. गणेश नाईक यांच्या रूपाने नवी मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेचा पहिल्यांदा भगवा फडकला होता. मात्र नाईक यांनी 1999 ला शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्या नंतर शहरातील शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आले होते. यानतंर झालेल्या महानगर पालिका निवडणूकीत शिवसेनेचे 15 ते 16 नगरसेवक निवडणूक येत होते. मात्र 2015 साली झालेल्या महानगर पालिका निवडणूकीत शिवसेनेने थेट 38 वर मजल मारली होती. याला कारणीभूत ठरले होते गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक असलेले विजय चौगुले यांनी केलेला सेनेत प्रवेश. आणि महाराष्ट्र शासकीय सेवेतून रिटायर झालेले आयएएस अधिकारी विजय नाहटा. 


गणेश नाईक समर्थक नगरसेवक, कॅाग्रेस नगरसेवकांना गळाला लावत शिवसेनेचे संख्याबळ 16 वरून 38 वर पोचवले होते. मात्र या दोघांनीही सेनेला सोडचिट्टी देत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 32 नगरसेवक घेवून घरोबा केल्याने परत एकदा नवी मुंबईतील सेनेची आवस्था बिकट झाली आहे. 38 नगरसेविकापैकी 32 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शहरातील सेनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे काय? अशी स्थिती सद्या तरी निर्माण झाली आहे. 


नवी मुंबई शिवसेनेत असलेल्या प्रबळ नेत्यांपैकी विजय चौगुले, शिवराम पाटील , किशोर पाटकर , सुरेश कुलकर्णी, रोहिदास पाटील या ज्येष्ठ नगरसेवकांनी शिवसेना सोडल्याने पक्षाला मोठा हादरा बसला आहे. या मध्ये विशेषता बेलापूर विधानसभा मतदार संघापेक्षा ऐरोली विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांनी शिंदे गटाला जास्त पसंती दिली आहे. दरम्यान  शिवसेनेतील जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि व्दारकानाथ भोईर यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सेनेत राहणे पसंत केले आहे. दोन जिल्हा प्रमुखांबरोबर इतर प्रमुख पदाधिकारी आणि सहा ते आठ नगरसेवक आजही शिवसेनेत कायम आहेत. 


गणेश नाईक यांच्या सोडचिट्टी नंतर शुन्यावर आलेल्या शिवसेनेला तळागाळातील कार्यकर्त्यांनी गेल्या 10 वर्षात वैभव प्राप्त करून दिले होते. आज तिच परिस्थिती शहरात परत एकदा सेनेवर ओडवली आहे. मात्र  याही स्थितीत शिवसेना गरूड झेप  घेईल  असा आशावाद शिवसेनेतील सर्व कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. 


कोण आहेत विजय नाहटा आणि विजय चौगुले.
विजय नाहटा- 
माजी  नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त…. शिवसेनेचे उपनेते.. उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात पर्यावरण , झोपडपट्टी समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी… २०१४ साली शिवसेनेकडून बेलापूर मतदार संघात उमेदवारी.. मात्र भाजपा कडून पराभव.. 
बेलापूर मतदार संघातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाहटांचे समर्थक… 


विजय चौगुले - 
माजी मनपा विरोधी पक्षनेते… माजी स्थायी समिती सभापती….दोन वेळा नगरसेवक… १० वर्ष  सिडको संचालक.. दोन वेळा ऐरोली विधानसभा तर एक वेळा ठाणे लोकसभा निवडणूकीत शिवसेना उमेदवार…. मात्र तिन्ही वेळा पराभव…. नवी मुंबईतील नगरसेवकांवर खास पकड…