Sri Lanka vs Australia Test Series: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेशी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायला मैदानात उतरला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना आज गॅलेच्या गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लिऑननं (Nathan Lyon) श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट्स घेऊन शेन वार्नच्या (Shane Warne) विश्वविक्रमाशी बरोबरी केलीय.


शेन वॉर्नने विश्वविक्रमाशी बरोबरी
नॅथन लिऑननं 9 वेळा आशियाई खेळपट्टीवर एका डावात 5 विकेट घेतल्या. या आकड्यांसह त्यानं ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. वॉर्ननं आशियामध्ये 9 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकाविरुद्ध पहिल्या डावात लिऑननं 25 षटकांत 90 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या आहेत.


 नॅथन लिऑनची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी
श्रीलंकाविरुद्ध पहिल्या कसोटीत नॅथन लिऑननं पाच विकेट्स घेतल्या. लिऑनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघानं श्रीलंकेला पहिल्या डावात 212 धावांवर गुंडाळलं.  लिऑननं त्याच्या कसोटी कारकिर्दीत 20 वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा लिऑन पाचवा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ठरलाय. शेन वॉर्न (37), ग्लेन मॅकग्रा (29), डेनिस लिली (23) आणि क्लेरी ग्रिमेट (21) नॅथन लियॉनच्या पुढे आहेत.


श्रीलंकाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम
श्रीलंकाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत लिऑननं सर रिचर्ड हेडलीला मागं टाकलं आहे. या यादीत तो 12 क्रमांकावर पोहचलाय. एवढेच नव्हेतर, कसोटी क्रिकेटमधील रंगना हेराथचा 433 विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून एक विकेट्स दूर आहे. लवकरच तो कपिल देवचा कसोटी क्रिकेटमधील 434 विकेट्स घेण्याचा आकडाही पार करेल. कपिल देवला मागं टाकल्यानंतर त्याचा कसोटी क्रिकेटमधील टॉप 10 गोलंदाजांमध्ये समावेश होईल.


हे देखील वाचा-