Navi Mumbai News : नवी मुंबईतील तुर्भे (Turbhe) इथे एक धक्कादायक घटना घडली आहे. रेस्टॉरंटसमोर लघुशंका करणाऱ्या इसमास रोखल्याने झालेल्या वादात संबंधित इसमाने हॉटेलच्या मॅनेजरला तब्बल एक किलोमीटरपर्यंत आपल्या कारच्या बोनेटवर फरफटत नेलं. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यातील एकाला अटक केली असून तिघांचा शोध सुरु आहे.
या प्रकरणी तुर्भे येथील संगीत बारमध्ये संबंधित व्यक्ती आपल्या मित्रांसोबत मद्य विकत घेण्यासाठी आला होता. पार्सल घेतल्यावर हॉटेल बाहेरच लघुशंका करत असताना हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले. यावरुन वाद झाला असता या इसमाने कारसमोर उभ्या असलेल्या हॉटेलच्या मॅनेजरला (Hotel Manager) बोनेटवरुन एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज (CCTV) देखील समोर आलं आहे, ज्यात कार चालक मॅनेजरला बोनेटवर फरफटत घेऊन जाताना दिसत आहे.
लघुशंका करताना हटकल्याने वाद, मॅनेजरला बोनेटवरुन फरफटत नेलं
मिळालेल्या माहितीनुसार दोन तरुण आणि बार मॅनेजर यांच्यात सुरुवातीला वादावादी झाली, त्यानंतर हाणामारी झाली. यानंतर तरुणाने बार मॅनेजरच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. बचाव करण्यासाठी मॅनेजर कारच्या बोनेटवर चढला. यामुळे संतापलेल्या तरुणाने कार थांबवण्याऐवजी मॅनेजरला एक किलोमीटरपर्यंत बोनटवरुन नेलं. या दरम्यान मॅनेजर खाली पटला आणि दोन्ही तरुण त्याला तिथेच सोडून पळून गेले. या प्रकरणी मॅनेजरने एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मॅनेजरने काय सांगितलं?
कारमध्ये चार जण होते, त्यापैकी एकाने बीयर खरेदी केली आणि परत गेला. पण काही वेळानंतर कारमधून एक व्यक्ती उतरला आणि रेस्टॉरंटसमोर लघुशंका करु लागला. त्याला हटकलं असता त्याने मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर अचानक कार सुरु केली, म्हणून मी बोनेटवर चढलो. या घटनेत मला दुखापतही झाली, असं मॅनेजरने सांगितलं.
याशिवाया वाद रोखण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, ते लोक आधीच नशेत होते. लघुशंका करण्यापासून रोखल्याने त्यांनी हाणामारी करण्यास सुरुवात केली. मी मध्ये पडल्याने त्यांनी मलाही मारहाण केली. मलाही दुखापत झाले आहे, असं मसूल शेट्टी नावाच्या व्यक्तीने सांगितलं.
हेही वाचा