Agriculture News : सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात देखील टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 100 ते 120 रुपयांच्या आसपास आहेत. मात्र, या टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळं सर्वसामान्यांची खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळं ग्राहकांनी टोमॅटो खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळं टोमॅटोला उठाव नसल्यानं नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. APMC बाजार समितीत प्रतिकिलो टोमॅटोला 70 रुपयांचा दर मिळत आहे.
100 रुपये किलोवर गेलेला टोमॅटो आज 70 रुपयांवर
महाग झालेल्या टोमॅटोकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळं टोमॅटोच्या किंमती उतरल्या आहेत. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये चार दिवसापुर्वी 100 रुपये किलोवर गेलेला टोमॅटो आज 70 रुपयांवर आला आहे. गेल्या काही दिवसात किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटोचे दर 130 ते 150 रुपयांवर गेला होता. टोमॅटोचे वाढलेले भाव पाहून ग्राहकांनी टोमॅटो खरेदीकडे पाठ फिरवली आहे. यामुळं एपीएमसीत आलेल्या टोमॅटोला उठाव नसल्यानं होलसेल मार्केटमध्ये टोमॅटोचे दर हे 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत. सद्या टोमॅटो 60 ते 70 रूपये किलोने एपीएमसीत विकला जात आहे.
टोमॅटोची आवक घटली
एपीएमसी मार्केटला नेहमी 40 ते 50 टोमॅटो गाड्यांची असणारी आवक सद्या 15 ते 20 गाड्यांवर आली आहे. यातील 15 गाड्या पश्चिम महाराष्ट्र तर 5 गाड्या कर्नाटकमधून येत आहेत. यामध्ये 10 ते 12 टेम्पो असून साधारण 6 टन टोमॅटो या गाडीत बसतो. तर 7 ते 8 पिकअप गाड्या असून यामध्ये 2.5 टनापर्यंत टोमॅटो बसतो. एपीएमसीमार्केटमध्ये आज भाजीपाल्याच्या 550 गाड्यांची आवक झाली आहे. टोमॅटोप्रमाणं इतर भाजीपाल्यांची किंमती 30 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
का वाढतायेत टोमॅटोचे दर?
15 एप्रिलपासून तीन ते चार जूनपर्यंत बाजारात टोमॅटो फेकून दिला जात होता. उत्पादन खर्च निघणेही शक्य नव्हते. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. साधारण: जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात सुधारणा व्हायला सुरुवात झाली. एप्रिल ते मे महिन्याच्या काळात प्रचंड ऊन होतो, अशातच टोमॅटोला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांनी लागवडी करणे सोडून दिल्याचे मत शेतमाल बाजार भाव अभ्यासक शिवाजी आवटे यांनी व्यक्त केले. लागवडी सोडून दिल्यामुळं बाजारात माल येणार कोठून, त्यामुळं बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचे आवटे म्हणाले. 25 जुलैच्या पुढे टोमॅटोचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात घट येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या:
Tomato Price : महाराष्ट्रात टोमॅटोचे दर का वाढतायेत? शेतकऱ्यांना फायदा होतोय का? शेतमाल बाजार अभ्यासकांचं म्हणणं काय...