Navi Mumbai Crime News:  नवी मुंबईतील (Navi Mumbai) महापे-शिळफाटा येथील अडवली भुतवली गावालगतच्या जंगलामध्ये महिलेचा मृतदेह 22 मार्च रोजी आढळला होता. नवी मुंबई पोलिसांना (Navi Mumbai Police) या हत्येचा उलगडा करण्यास यश मिळाले आहे. एक हजार रुपयांची मागणी केल्याने ही हत्या करण्यात आली असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. 


22 मार्च रोजी घडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद अहमद मोहम्मद अली साईन (वय 36) या रिक्षा चालकाला अटक केली आहे. आरोपी रिक्षा चालकाने मृत महिलेसोबत शरीर संबध ठेवले होते. त्यानंतर महिलेने आरोपीकडे एक हजार रुपयांची मागणी केली. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादातून रिक्षा चालकान महिलेच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा दगड घालून तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 


जंगलात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच संशयित वाहनांच्या नोंदी घेऊन त्यांची छाननी सुरू केली. त्यातून एका रिक्षामधून एक महिला व रिक्षा चालक हे दोघेही अडवली भुतवली येथील गावदेवी मंदिराकडे जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध सुरू केला. त्यानंतर रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. अखेर पोलिसांच्या तपासात त्याने आपला गुन्हा कबुल केला. 


तुर्भे इंदिरा नगर परिसरातून प्रवासी शोधत असताना सदर महिला प्रवासी म्हणून आरोपीच्या रिक्षात बसली. पुढे अडवली भुतवली परिसरातील निर्जन ठिकाणी आल्यावर महिलेसोबत आरोपीने शरीरसंबंध ठेवले. त्या मोबदल्यात तिने आरोपीकडे एक हजार रुपयांची मागणी केली. परंतु रक्कम देण्यास आरोपीने नकार देताच त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादामधून आरोपीने महिलेला ठार केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


झुडुंपामध्ये आढळला होता मृतदेह


अडवली भुतवली गावच्या हद्दीतील महापे शिळफाट्याकडून सत्ती देवी या गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत झुडुपांमध्ये हा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षाच्या दरम्यान होते. पोलिसांना मृतदेहाची माहिती मिळताच तातडीने तपास सुरू करण्यात आला होता.