Metro Fare: मुंबई : राजधानी मुंबईकरांना लोकल आणि मेट्रोचा प्रवास नित्याचा बनलेला आहे. लोकलने प्रवास मोठ्या गर्दीत करावा लागतो, तुलनेनं विचार केल्यास लोकलचा प्रवास स्वस्त आहे. मात्र, मेट्रो (Metro) तिकीट महाग असल्याने अनेकदा प्रवाशी मेट्रोपेक्षा लोकलला प्राधान्य देतात. मात्र, आता मेट्रोमध्येही प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मेट्रो प्रवास हेही आता मुंबईकरांची गरज बनली आहे. त्यामुळे, मेट्रोच्या तिकीट दराबाबत नेहमीच विषय पुढे येतो. मात्र, आता सिडकोने नवी मुंबईकरांना (Navi Mumbai) मोठा दिलासा दिला आहे.  सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये 33% पर्यंत लक्षणीय कपात करण्यात आली असून 07 सप्टेंबर 2024 पासून नवी मुंबई मेट्रो सेवेकरिता सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार तिकीटाचा किमान दर रु. 10 व कमाल रु. 30 असणार आहे. 


“जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असणाऱ्या मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा याकरिता तिकीट दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. सुधारित तिकीट दरांमुळे जवळच्या तसेच लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही फायदा होणार आहे. यापुढेही नवी मुंबईकरांनी मेट्रो सेवेला असाच उत्तम प्रतिसाद देत राहावा आणि या सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा.” असे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको विजय सिंघल यांनी म्हटले आहे.  दरम्यान, नवी मुंबईतून मेट्रोने दैनिक प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.


कसं आहे नव दरपत्रक


या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना दिलासा देण्याकरिता मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. सुधारित दरांनुसार पहिल्या 0 ते 2 कि.मी. आणि 2 ते 4 कि.मी. करिता रुपये 10, पुढील 4 ते 6 कि.मी. आणि 6 ते 8 कि.मी.साठी रुपये 20 आणि 8 ते 10 कि.मी. च्या टप्प्यासह त्या पुढील अंतराकरिता रुपये 30, असे तिकीट दर लागू होणार आहेत. यापूर्वी, बेलापूर टर्मिनल ते पेंधर टप्प्याकरिता तिकीटाचा दर रु. 40 इतका होता, हा तिकीट दर आता रु. 30 असणार आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गामुळे सीबीडी, तळोजा एमआयडीसी आणि सिडकोच्या खारघर येथील गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. या मार्गावर 17 नोव्हेंबर 2023 पासून मेट्रो सेवा सुरू झाली असून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मेट्रो सेवेला लाभला आहे. 


हेही वाचा


लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, विषय मंत्रिमंडळात; निधी कुठेही न वळवल्याचा 'स्वयंस्पष्ट आदेश'