नवी मुंबई : राज्य सरकारनं महाराष्ट्रातील पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये  दिले जातात. या योजनेचा राज्यातील कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे. एकाच महिलेच्या नावे 30 वेगवेगळे अर्ज, वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करुन एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करत मिळणारी रक्कम लाटल्याचा प्रकार घडला आहे.  साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल करुन एकच मोबाईल नंबर नोंदवला केले. या प्रकरणात सहकारी बँकेच्या खात्यात आतापर्यंत 26 अर्जांची रक्कम जमा झाली आहे.


या प्रकरणातील संबंधित व्यक्तीनं एकाच पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखात काढून 27 महिला असल्याचं दाखवलं असल्याचं देखील उघड झालं आहे, या प्रकरणी पनवेल तहसिलदार कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


खारघर येथील रहिवासी असलेल्या पूजा महामुनी यांचा अर्ज दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरुन दाखल करुन मजूंर करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. महामुनी यांनी पनवेलमधील भाजपचे माजी नगरसवे निलेश बाविस्कर यांना अर्ज दाखल करण्यासाठी 28 ऑगस्ट रोजी मदत मागितली. 29 ऑगस्टला महामुनी यांनी मोबाईल नंबर नोंदवून लॉगीन करण्याचा प्रयत्न केला असता लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल आणि मंजूर करण्यात आल्याची माहिती दाखवण्यात आली, यामुळं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


निलेश बाविस्कर यांनी यानंतर अधिक चौकशी करुन त्या मेसेजमध्ये मिळालेल्या फोन नंबरवर फोन केला असता संबंधित व्यक्तीनं  तो सातारा येथील असल्याचं सांगितलं. संबंधित व्यक्तीला निलेश बाविस्कर यांनी ओटीपी शेअर करायला सांगितला, त्या व्यक्तीनं तो दिला देखील. 


निलेश बाविस्कर यांनी सामाजिक कार्यकर्त्या कांचन बिर्ला यांच्या मदतीनं माहिती घेतली असता 30 लाभार्थी महिलांची खाती एकाच मोबाईल नंबरला लिंक करण्यात आल्याचं समोर आलं. त्या पैकी 27 लाभार्थ्यांचं नाव एक सारखं होतं मात्र आधार कार्ड नंबर वेगवेगळे होते. यापैकी 26 अर्ज मंजूर झाले असून चार अर्ज मंजूर झालेले नाहीत. यामुळं  महामुनी, बिर्ला आणि बाविस्कर यांनी पनवेल तहसिलदारांकडे तक्रार दिली. संबंधित व्यक्तीनं पासवर्ड देखील बदलले असल्याचं समोर आलं आहे.   


पनवेल तहसिलदारांकडे तक्रार


खारघर येथील महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर निलेश बाविस्कर यांनी शोध घेतला असता पुजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाला असल्याचे समोर आले. मात्र, त्यांच्या आधारकार्ड ला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ॲड झाला होता. याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल 30 अर्ज भरल्याचे दिसून आले. यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसिलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.


इतर बातम्या :


1 सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 4500 नव्हे तर फक्त 1500 रुपयेच हाती पडणार


लाडकी बहीण योजनेसाठी दिव्यांग मुलीच्या बापाची धडपड, शाळेच्या मुख्याधापकाने 200 रुपयांची लाच मागितली, वडिलांचं मुख्यमंत्र्यांना आर्त साद