Navi Mumbai : शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्याच आठवड्यात 8 वी च्या विद्यार्थ्याचा सहलीला गेला असताना मृत्यू झाला होता. यामुळे शिक्षण विभागावर टीका होत असतानाच आता याच विभागातील टेंडर घोटाळा समोर आला आहे. 5 कोटींचे टेंडर काढताना संबंधित विभागांची लेखी परवानगी न घेता वरिष्ठांच्या आदेशाने टेंडर काढत मर्जीतील ठेकेदाराला काम दिले असल्याचा आरोप माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्यांनी केला आहे.
सोलार ऑपरेटेड रोबोटिक कोडिंग आर्टिफिशीअल इंटेलिजन्स प्रयोगशाळा उभी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या (Navi Mumbai municipal corporation) शिक्षण विभागाने टेंडरमध्ये मोठा घोळ केल्याचा कारनामा उघडकीस आला आहे. पालिकेच्या कोणत्याही कामाचे टेंडर काढताना शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा विभाग आणि सल्लागार संस्थेचा अभिप्राय घेतला जातो. मात्र पाच कोटी रुपये खर्चाचे हे काम पुणे शहरातील एका संस्थेच्या घशात घालण्यासाठी शिक्षण विभागाने कोणाचाच अभिप्राय घेतला नाही. त्यामुळे हे टेंडर आणि काम वादाच्या भोवर्यात सापडले आहे.
टेंडर प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप
सोलार ऑपरेटेड रोबोटिक कोडिंग आर्टिफिशीअल इंटेलिजन्स प्रयोगशाळा उभी करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेला 4 कोटी 99 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नियमानुसार या निविदेवर शहर अभियंता आयटी विभाग, कार्यकारी अभियंता आयटी विभाग, लेखा अधिकारी आणि सल्लागार यांचा अभिप्राय घेणे आवश्यक होते. मात्र तसे काहीच न करता ही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यामुळे या टेंडर प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत आणि सुहास मिंडे यांनी केला आहे.
उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
हे काम ठरावीक एकाच संस्थेला मिळावे म्हणून शिक्षण विभागाने टेंडर प्रक्रियेमध्ये शॉर्टकट मारला आहे. त्यामुळे टेंडरमध्ये गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आर्शिवादामुळे हा घोटाळा झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या टेंडर घोटाळ्याची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत आणि सुहास मिंडे यांनी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या