Navi Mumbai: झटपट आणि विना कष्ट, अर्थात आजच्या भाषेत शॉर्टकट मार्गाचा अवलंब करीत अंमली पदार्थ विकणाऱ्या युवकास पोलिसांनी नवी मुंबईतून (Navi Mumbai) अटक केली आहे. त्याच्याकडे 6 लाखांचा एलएसडी (LSD) हा अंमली पदार्थ आढळून आला, त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याला अटक केली आहे.


मोहमंद फैसल खतीब (वय 27 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडे एकूण 6 लाख रुपये किमतीचा 1 ग्रॅम वजनाचा एलएसडी पेपर (LSD Paper) हा अंमली पदार्थ आढळून आला. चौकशीत तो विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगत असल्याचे समोर आले. याहून धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी हा उच्च शिक्षित आहे. आरोपी आर्किटेक्चरमध्ये (Architecture) पदवीधर असून तो उच्च शिक्षण घेत आहे, त्याची घरची आर्थिक परिस्थिती देखील चांगली आहे आणि असे असूनही केवळ पैशांच्या हव्यासापोटी तो हा बेकायदेशीर धंदा करत असल्याचे तपासात समोर आले आहे.


एक व्यक्ती नवी मुंबईतील पाम बीच (Palm Beach) येथे अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. नवी मुंबईतील पाम बीच (Palm Beach) हा मुख्य रस्त्याला लागून असलेला भाग असून येथे कायम रहदारी असते. आरोपी मोहमंद खतीब हा या मार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावर (Service Road) येणार, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी नेरुळ सेक्टर 14 येथे सापळा लावला होता.


बुधवारी (31 मे) रात्री सव्वा नऊच्या सुमारास आरोपी मोहमंद फैसल खतीब हा एकूण 6 लाख रुपये किमतीचा 1 ग्रॅम वजनाचा एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला असताना त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सदरचा एलएसडी हा अंमली पदार्थ तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.


गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासीत अली सय्यद, पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगे, पोलीस हवालदार रमेश तायडे, पोलीस नाईक महेंद्र अहिरे, अनंत सोनकुळ तसेच गुन्हे शाखा प्रशासन विभागाचे पोलीस हवालदार रविंद्र कोळी आणि पोलीस नाईक संजय फुलकर या पथकाने मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने सापळा लावला होता.


हेही वाचा:


Sangli Crime: पोलीस असल्याचे भासवले, पेहरावही तसाच; सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्स शॉपी सशस्त्र दरोड्यातील आरोपी व गाडीचे फुटेज पोलिसांच्या हाती!