MLA Yogesh Kadam Accident : शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघातात योगेश कदम यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत. पोलादपूरच्या कशेडी घाटात टँकरने मागून धडक दिल्यानं अपघात झाला. दरम्यान माझ्या गाडीला झालेला अपघात घातपाताची शक्यता असू शकते, असा संशय आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे. 


एबीपी माझाशी बोलताना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम म्हणाले की, "काल रात्री माझ्या गाडीचा अपघात झाला. परंतु, आई जगदंबेच्या कृपेनं या अपघातातून मी सुखरूप बचावलो. माझ्या गाडीच्या पाठी माझी एस्कॉर्ट गाडी होती आणि पुढे रायगड पोलिसांची गाडी होती. तरीही, पाठून एक डंपर वेगानं आला आणि पाठच्या पोलिसांच्या गाडीला धडकला. त्यानंतर माझ्या गाडीलासुद्धा जोरदार धडक बसली आणि अपघात झाला. पण मी सीटबेल्ट घातला होता. त्यामुळे मला काहीही दुखापत झाली नाही."


"अपघात झाल्यानंतर डंपर चालक हा फरार झाला आहे. फरार चालकाचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. पण या अपघाताचा पॅटर्न जरा वेगळा आहे. त्यामुळे यात घातपाताची शक्यता आहे. या अपघाताबाबत तपास करण्यासाठी मी पोलिसांना सांगितलं आहे. तसेच, या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेही केली आहे.", असं योगेश कदम म्हणाले. "आम्हाला जी शंका आली आहे, त्यादृष्टीनं तपास करुन सत्य जर पुढे आलं, तर चांगलंच आहे. भविष्यात त्या दृष्टीनं काळजी घेता येईल.", असंही योगेश कदम म्हणाले. 


"मुंबई गोवा महामार्ग हा सुद्धा लवकरात लवकर व्हावा. यासाठी मी अगोदर पाठपुरावा केलेला आहेच आणि आता ही करतोय. आम्ही ठाकरे गटाचं नाव घेत नाही किंवा थेट कोणावर आरोप केला नाही. चौकशी करून या अपघाताचा जो काही अहवाल आहे, तो समोर येईल. आम्हाला शंका आली म्हणून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करतोय.", असंही योगेश कदम म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : Yogesh Kadam Car Accident : आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला घातपाताचा संशय 



अपघात कसा झाला? 


आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले होते. कशेडी घाटात पोलादपूरनजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरनं जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्यानं त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचं मागच्या बाजूचं नुकसान झालं आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. कशेडी घाटात टॅंकरनं योगेश कदमांच्या गाडीला जोरात धडक दिली. यात योगेश कदम यांच्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनेनंतर टँकरचालक हा पळून गेल्याची माहिती आहे. योगेश कदम हे या अपघातात सुखरुप आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


MLA Yogesh Kadam Accident : कशेडी घाटात टँकरची धडक, गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर; नेमका कसा झाला योगेश कदम यांचा अपघात?