Maharashtra Bhushan Award Ceremony : नवी मुंबईच्या (Navi Mumbai) खारघरमधील (Kharghar) सेंट्रल पार्क मैदान सज्ज आहे उद्याच्या भव्य अशा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यासाठी. महाराष्ट्र भूषण 2022 हा पुरस्कार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना देण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील सरकारमधील जवळपास सर्व महत्त्वाचे नेते, मंत्री उपस्थित राहतील. शिवाय या खास कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंतचा सर्वात मोठा महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आयोजन हे उद्या नवी मुंबईत केला जाणार आहे. त्यामुळे एवढ्या भव्य दिव्य महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या आयोजनाची नेमकी तयारी कशी करण्यात आली आहे आणि याचा सरकारला नेमका कसा राजकीय फायदा होणार हे जाणून घेऊया...


खारघरमधल्या सेंट्रल पार्कच्या मैदानावर 400 एकर परिसरात आतापर्यंतचा सर्वात मोठा महाराष्ट्र भूषण पुरस्कार होणार आहे. समाज प्रबोधन, अध्यात्म, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला आहे. त्यामुळे जवळपास 20 लाख श्री सदस्य अनुयायी आणि सर्व सामान्य लोक या कार्यक्रमाला या मैदानावर उपस्थित राहतील त्या पार्श्वभूमीवर तयारी राज्य सरकारच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे


हा महाराष्ट्र भूषण सोहळा आतापर्यंत सर्वात मोठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. शिवाय या कार्यक्रमाची जबाबदारी उदय सामंत, शंभूराज देसाई आणि रवींद्र चव्हाण या मंत्र्यांवर दिली आहे. कारण एवढ्या मोठ्या अशा महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा राजकीय फायदा सुद्धा सरकारला होणार आहे याची कल्पना दोन्ही पक्षांना आहे.


आता हा राजकीय फायदा नेमक्या कशा प्रकारे होणार हे समजून घेऊया



  • पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना संपूर्ण कोकणातील लाखो श्री सदस्य त्यासोबतच त्यांना मानणारा वर्ग खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर येणार आहेत.

  • त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका असतील किंवा मग लोकसभेच्या निवडणुका या सगळ्याचा विचार करता दोन्ही पक्षांना कोकणात आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा असणार आहे.

  • शिवाय देशाचे गृहमंत्री अमित शहा स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळं महत्त्व प्राप्त होईलच, शिवाय गृहमंत्र्यांसमोर एक मोठा जनसमुदाय या कार्यक्रमाच्या निमित्त पाहायला मिळणार आहे.

  • आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे समाजसेवक म्हणून कार्य करत असताना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. मात्र त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आप्पासाहेबांना गुरु समान मानतात, देवेंद्र फडणवीस यांचे धर्माधिकारी हे चांगले स्नेही आहेत.

  • त्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी आणि त्यांना मानणारा वर्ग पाहता हा सोहळा तेवढाच मोठा आणि भव्य करण्याचा पूर्ण प्रयत्न राज्य सरकारने करण्याचे नियोजन केलं आहे आणि त्यातून कोकणवासियांचे मन जिंकण्याचा सुद्धा


पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा



  • श्रीमत दासबोधाच्या निरुपणातून समाज घडवण्याचं मोठं कार्य त्यांनी केलं आहे.

  • वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची दखल संपूर्ण जगातून घेण्यात आली आहे. शिवाय लाखो वृक्ष संवर्धनाचं कार्य त्यांनी केलं आहे.

  • अंधश्रद्धेवर प्रहार, व्यसनमुक्ती, लोकशिक्षण यावर त्यांनी कायम भर दिला

  • स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाव, वाड्या,शहर स्वच्छ करण्याचा दैनंदिन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे

  • रक्तदान शिबिर ,आरोग्य शिबीर आयोजित करून समाजकार्य त्यांनी केलं

  • त्यांचा हे समाजाप्रती काम पाहून पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारने त्यांना गौरवलं आहे

  • त्यामुळे जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे स्वतः आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी गेले होते 


खरंच राजकीय फायदा होणार?


त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा भव्य दिव्य होणार यात कुठलीच शंका नाही. कारण लाखो अनुयायांनी आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणाऱ्या लोकांनी हे मैदान भरुन जाणार आहे. आता या सगळ्या कार्यक्रमा मागे राजकीय फायद्याचा जरी दोन्ही पक्षानी विचार केला गेला तरी खरंच राजकीय फायदा यातून साधला जाणार का हे आता सांगणं जरी कठीण असलं तरी निवडणुकांमध्येच हा फायदा कितपत झाला हे समजून येईल.