Kharghar Stampede :  स्वाध्याय परिवाराचे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा खारघर येथे पार पडला होता. या सोहळ्यात चेंगराचेंगरीमुळे अनेक निरपराध व्यक्ती मृत्यूमुखी पडले होते तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी पनवेल कोर्टात धाव घेतली आहे. या कार्यक्रमात शासकीय निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप अॅड. सरोदे यांनी केला.


खारघर चेंगराचेंगरी प्रकरणासंदर्भात काही कागदपत्रे सादर करण्यात आली असून राजकीय हेतूसाठी नियोजन शून्य कार्यक्रम करुन शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप देखील वकील असीम सरोदे यांनी केला आहे. या प्रकरणी सरकारी अधिकारी आरोपी असल्याने त्यांच्या विरोधात खटला चालविण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक असते. मात्र तीन महिने उलटूनही सरकारने याविषयी हालचाल न केल्याने सरकारी परवानगी शिवाय आता केस चालवण्यात काहीही हरकत नसल्याची प्रतिक्रिया वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. पुढील सुनावणीला न्यायालय नक्की दखल घेईल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.






16 एप्रिल 2023 रोजी स्वाध्याय परिवाराचे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला होता. खारघरमधील सेंट्रल पार्क इथं झालेल्या या भव्यदिव्य सोहळ्यात लाखोंच्या संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून धर्माधिकारी यांचे श्रीसदस्य जमा झाले होते. कार्यक्रमात उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे 14 जणांचा मृत्यू झाला़ होता. दुर्घटनेच्या चौकशीसाठी  एकसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. 


इतक्या मोठ्या संख्येनं लोकं येणं अपेक्षित असताना कार्यक्रमाचं ढिसाळ आयोजन, उन्हापासून संरक्षण देणाऱ्या व्यवस्थेचा अभाव, पाणी, वैद्यकीय सुविधा या दुर्लक्ष असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले गेले होते. महाराष्ट्र भूषण हा शासकीय पुरस्कार असल्यामुळे जनतेचा पैसा यामध्ये अयोग्य पद्धतीने वापरला असा आरोप करण्यात आला होता.