नवी मुंबई : महाराष्ट्र बैलगाडा संघटेनेचे अध्यक्ष आणि गोल्डमॅन अशी ओळख असलेल्या पंढरीनाथ फडके (Pandharinath Phadke) यांचे निधन झाले आहे. पनवेल येथे रूग्णालयात हृदयविकाराने त्यांचे निधन झालं. महाराष्ट्रभर छकडा फेम म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर बैलगाडा शर्यतप्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक शर्यतप्रेमींनी हजेरी लावली. 


पनवेलच्या विहिघर येथील असलेल्या पंढरीनाथ फडके यांना बैलगाडा शर्यतीची मोठी आवड. महाराष्ट्रात कुठेही बैलगाडा शर्यत असेल तर त्या ठिकाणी ते हजर असायचे. तसेच शर्यतीच्या 40 हून जास्त बैलं त्यांच्याकडे होती. सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर ती परत सुरू करावी यासाठी पंढरीनाथ फडके यांनी प्रयत्न केले होते. 


गोल्डमॅनची वेगळी स्टाईल


ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यत असायची त्या ठिकाणी पंढरीनाथ फडके यांची एन्ट्री धमाकेदार व्हायची. त्याच्या गळ्यात आणि अंगावर इतकं सोनं असायचं की कुणाचीही नजर त्यांच्याकडे जायची. त्यामुळे महाराष्ट्रातील गोल्डमॅन अशीही त्यांची ओळख होती. शर्यतीच्या ठिकाणी त्यांची गाडीच्या टफावर बसून ग्रँड एन्ट्री हा नेहमीच चर्चेचा विषय ठरायचा. 


नंबर वन बैलावर पंढरीनाथ फडकेंची नजर


शर्यतीत जिंकणाऱ्या बैलावर पंढरीनाथ फडके यांची नजर असायची. मग तो बैल कितीही किंमत लागली तरी ते विकत घ्यायचे. 11 लाख रुपये देऊन त्यांनी एक जिंकलेला बैल खरेदी केला होता. त्यावरून त्यांना बैलगाडा शर्यतीचा आणि बैलांची किती आवड होती हे लक्षात होतं. 


रायगड जिल्ह्याचं नाव बैलगाडा शर्यतीत पुढे आणलं ते पंढरीनाथ फडके यांनी. त्यांच्यावर एक गाणंही तयार करण्यात आलं असून ते सोशल मीडियात चांगलंच व्हायरल झालं आहे. 


पंढरीनाथ फडके चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. हातात आणि गळ्यात मोठ्या प्रमाणावर सोने ही त्यांची ओळख होती. ते सुरुवाताली ते शेकापचे कार्यकर्ते होते, नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


जामीनावर बाहेर आल्यानंतर तब्येत खालावली


कल्याण येथे गेल्या वर्षी राहुल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांच्यातील वादातून भर रस्त्यात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी पंढरीनाथ फडकेंना शिक्षा सुनावण्यात आली होती. जामीनावर बाहेर आल्यानंतर तब्येत खालावली होती. त्यांना मधुमेहाचा त्रासही सुरू झाला होता. उपचाराचा भाग म्हणून त्यांच्या पायाची काही बोटंही कापण्यात आली होती. 


ही बातमी वाचा: