नवी मुंबई: लेडिज बार, पब, हुक्का पार्लरवर कारवाई करताना फॅमिली रेस्टॉट्ना टार्गेट करू नका अशा सूचना भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांची नवी मुंबई पालिकेला दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शहरातील अनधिकृत पब, बारचे बांधकाम तोडण्याची भूमिका नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतली होती. पण गणेश नाईकांच्या विरोधानंतर आता ही कारवाई थांबवण्यात आली आहे.
शहरात वाढलेले अनधिकृत आणि विना परवाना चालणाऱ्या लेडिज बार, पब, हुक्का पार्लरवर गेल्या काही दिवसात तोडक कारवाई सुरू आहे. महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून शहरातील जवळपास 50 पब, बार, हुक्का पार्लरचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे.
फॅमिली रेस्टॉरंट्सना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप
अनधिकृत बारवर कारवाई होत असताना विनाकारण फॅमिली रेस्टॅारंट्सनासुध्दा टार्गेट केले जात असल्याचा आरोप हॅाटेल मालकांनी केला. फॅमिली रेस्टॅारंट्सच्या बाहेर उभारण्यात आलेले पावसाळी शेड तोडू नये यासाठी हॅाटेल मालकांनी भाजपा आमदार गणेश नाईक यांची भेट घेतली होती. यानंतर गणेश नाईक यांनी फॅमिली रेस्टॅारंट्सवर होणारी कारवाई काही दिवस थांबवावी अशी सुचना महानगरपालिका आयुक्तांना केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कारवाईनंतर महापालिकेची कारवाई
पुण्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच ड्रग्ज सापडल्याची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अनधिकृत पब, बार यांच्यावर बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले होते. अनधिकृत पब आणि बारमुळे गुन्हेगारीकरण वाढत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले होते. त्याच आदेशाचं पालन करताना नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई सुरू केली.
गणेश नाईकांचा कारवाईला विरोध
पण महापालिका आयुक्तांनी सुरू केलेल्या तोडक कारवाईला भाजप आमदार गणेश नाईक यांनी आक्षेप घेत त्याला विरोध केला. सरसकट कारवाई करण्यास त्यांनी विरोध केला असून आधी नोटीस द्या आणि मालकांना स्वतः बांधकाम तोडू द्या अशी भूमिका भाजप आमदार गणेश नाईक यांनी घेतली. त्यानंतर नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईला ब्रेक लागला होता.
सीबीडीपासून दिघ्यापर्यंत असलेल्या लेडीज बार, पबवर बुलडोझर फिरवण्यात आले होते. या तोडक मोहिमेत जवळपास 50 लेडिज बार, पब, हुक्का पार्लरचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते. त्यानंतर गणेश नाईकांच्या भूमिकेनंतर महापालिकेने ही कारवाई थांबवली.
ही बातमी वाचा: