मुंबई : ज्यांची सिडकोमध्ये घरे आहेत त्यांच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सिडकोची घरे आता जर विकायची असतील तर त्यासाठी सिडको महामंडळाच्या एनओसीची गरज लागणार नाही. तसेच दुसऱ्या व्यक्तीला घर विकायचे असेल तर त्यासाठी लागणारे शुल्कही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोचं घर लागल्यानंतर ते लीज वरती न राहता स्वतःच्या मालकीचं होणार आहे. सिडको महामंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली. 


या आधी सिडकोची घरे विकायची असतील तर त्यासाठी महामंडळाची एनओसी घ्यावी लागत होती. तसेच या घरांची विक्री करताना त्यासाठी शुल्कही भरावं लागणार होतं. आता ही नियम रद्द करण्यात आला असून सिडकोच्या घरांची विक्री सहजपणे करता येणार आहे.


याबाबत सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट म्हणाले की, सिडकोच्या घरांवरील लिज होल्ड करा अशी मागणी सातत्याने केली जात होती. आता ही घरं फ्री होल्ड करण्याचा निर्णय आजच्या बोर्ड मिटींगमध्ये घेतला आहे. ⁠घर विकताना जे पैसे लागायचे तेही फ्री केलेल आहे. 100 मीटरच्या वरती जी घर असतील त्यांच्याकडून नाममात्र शुल्क घेतलं जाणार आहे. त्यामुळे ⁠सर्वसामान्य जनतेच्या हक्काचं घर होणार आहे. ⁠पुढील मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय होईल. 


सिडको महामंडळाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा सुमारे सव्वालाख लोकांना होणार आहे. या निर्णयाचा सिडको महामंडळाच्या वसुलीवर काहीसा परिणाम होणार असला तरी महसुलासाठी इतर पर्याय अवलंबले जाणार आहेत.  या निर्णयाचा फायदा नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूरला होणार आहे. 


सिडकोची लॉटरी 7 ऑक्टोबरला


सिडकोच्या नवी मुंबईतल्या घरांसाठीच लॉटरी येत्या सोमवारी म्हणजे 7 ऑक्टोबरला काढण्यात येईल. या लॉटरीसाठी आधी 2 ते 5 ऑक्टोबरदरम्यानची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण सिडकोकडून लॉटरीसाठी आधी देण्यात आलेली तारीख बदलून आता 7 ऑक्टोबर ही नवी तारीख देण्यात आली आहे. त्यादिवशी सिडकोनं बांधलेल्या 26 हजार सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळं मध्यमवर्गियांच्या नवी मुंबईतल्या घराचं स्वप्न साकार होणार आहे.


ही बातमी वाचा: