नवी मुंबई: मराठा समाजाच्या तरुणांसाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी या संस्थेमुळे अनेक मराठा तरुण हे आज सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यांवर आहेत. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे मराठा तरुण (Maratha Reservation) हा आज नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा झाला आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते बुधवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचाल. त्यांनी म्हटले की, मी आता 25 हजारांची पोलीस भरती केली. त्यामध्ये मराठा समजाला नोकरीत देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाप्रमाणे मराठा तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. कोणाचं म्हणणं वेगळं असेल, पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की, मराठा समाजाचे हक्क त्यांना मिळावेत. समाजात दुफळी निर्माण होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. पण मला एक समाधान आहे की, मागच्या काही काळात नजर टाकल्यास लक्षात येते की, मराठा समाज इतका मोठा आहे की, केवळ आरक्षण देऊन त्यांना नोकऱ्या मिळू शकत नाहीत. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाचे कल्याण करणे कठीण आहे.
त्यासाठी आपण सारथी सारखी संस्था तयार केली होती. उच्च शिक्षणात मराठा समाजाचा टक्का वाढावा, आयएएस, आयपीएस अधिकारी तयार व्हावेत, त्यासाठी मी सारथीची निर्मिती केली. सारथीच्या माध्यमातून एकूण 51 विद्यार्थी युपीएससी पास झाले. त्यापैकी 12 आयएएस, 18 आयपीएस झाले. 480 एमपीएससी तहसीलदार ते डेप्युटी कलेक्टर अशा विविध पदांवर आहेत. सारथीमुळे आमचं कल्याण झाल्याची भावना समाजात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे मराठा तरुण नोकऱ्या देणारे झाले; फडणवीसांचा दावा
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्वी इतके कार्यरत नव्हते. मी त्यावेळी नरेंद्र पाटील याना विनंती केली. नरेंद्रजी हे महामंडळ बंद असल्यासारखं आहे, तुम्ही जबाबदारी घ्या, मी पैशाची कमतरता पडू देणार नाही, असे मी त्यांना सांगितले. आपण मराठा समाजात उद्योजक निर्माण करण्यासाठी हे सुरु केलं होतं. खरोखर सांगतो, आज जे काम आर्थिक विकास महामंडळात नरेंद्र पाटलांनी काम करुन दाखवलं तसं देशात झालं नाही. या महामंडळाने 1 लाख मराठा तरुणांना उदयोजक बनवलं, ८००० कोटी पेक्षा जास्तीच कर्ज दिलं. मराठा समाजाचे तरुण आता नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे झाले आहेत. हे नरेंद्र पाटील यांचे श्रेय आहे. ते पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यात फिरले, प्रसंगी बँकांशी भांडले. माथाडी आणि मराठा हे दोन विषय आले की नरेंद्र पाटील सरकारलाही सोडत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आणखी वाचा
मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनावरुन लक्ष वळवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर केल्याचा आरोप