Navi Mumbai Cidco Project : स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबई शहर वसवणाऱ्या सिडकोला (CIDCO) आपल्या कामाचा विसर पडल्याचं दिसून येत आहे. लाखो घरं बांधून ती विकण्यात तरबेज असलेल्या सिडकोने आता चक्क गृहप्रकल्प उभारणीसाठी सल्लागार नेमला आहे. या सल्लागार कंपनीला सल्ला देण्यासाठी 28 कोटींचा नजराना देण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यात अशाच पध्दतीने सल्लागार कंपन्यांवर दौलतजादा उडवणाऱ्या सिडकोची आर्थिक परिस्थिती 'सल्ला' घेवून
'गार' होण्याची शक्यता आहे.
व्हिआयपी लोकांच्या घरांसाठी सल्लागार कंपनीची नेमणूक
सिडकोच्या माध्यमातून सिवूड पाम बीच (Palm Beach) लगत अलिशान व्हीआयपी गृहप्रकल्प (Cidco VIP House Project) उभारण्यात येणार आहे. आमदार , खासदार, न्यायाधीश , आय ऐ एस, आय पी एस आदी व्हिआयपी लोकांना या गृहप्रकल्पात घरं देण्यात येणार आहेत. दोन ते चार बीएचके अशी या घरांची साईझ असून दीड ते साडेतीन कोटींपर्यंत या घरांच्या किंमती आहेत. यानुसार 525 घरं बांधण्यात येणार आहेत. हा गृहप्रकल्प कसा असावा यासाठी सल्लागार कंपनी नेमण्यात येणार आहे. हा सल्ला घेण्यासाठी सिडको तब्बल 28 कोटी मोजणार आहे.
सल्लागारांना 28 कोटी, आर्किटेक्ट कंपनीला 15 कोटी
सिडकोच्या नुकत्याच झालेल्या संचालक बैठकीत सिवूड येथील व्हिआयपी गृहप्रकल्पासाठी सल्लागार कंपनी आणि आर्किटेक्ट कंपनी नेमण्यात आली आहे. टाटा कन्सल्टींग आणि हितेन सेठी ॲंन्ड असोसिएट कंपनीला सल्लागारापोटी 28 कोटी देण्यात येणार आहेत. तर आर्किटेक्ट कंपनीला 15 कोटी मोजले गेले आहेत.
28 कोटींचा महागडा सल्ला कशासाठी?
सिडकोने नवी मुंबई , पनवेलमध्ये अनेक लहान-मोठे गृहप्रकल्प स्वत: उभे केले आहेत. पामबीच रोडवर एनआरआय सारख्या विदेशातील लोकांसाठी पंचतारांकीत सोसायटी बांधली आहे. तर खारघर सेक्टर 36 येथे व्हल्लीशिल्प सारखा सर्व सुविधायुक्त गृहप्रकल्प उभारला आहे. यासाठी सिडकोच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीच डिझाईन तयार करून बांधकाम पुर्णत्वास नेलं होतं. सिडकोचं कामच गृहप्रकल्प उभारणीचं असताना आता व्हीआयपी गृहप्रकल्पासाठी 28 कोटींचा महागडा सल्ला कशासाठी असा प्रश्न सद्या उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे सिडकोचे पैसे वाचवण्यासाठी नेमणूक केलेले एम डी , जॅाईंट एम डी मात्र यावर मूग गिळून गप्प बसले आहेत.
हेही वाचा: