NIA Raids:  राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकले. त्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी ( नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा कोंढवा (पुणे) आणि शरजील शेख, झुल्फिकार अली बडोदावाला (पडघा, ठाणे) अशी त्यांची नावे आहेत.
 
 28 जून 2023 रोजी NIA द्वारे नोंदवलेल्या ISIS महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पाच ठिकाणी त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली. NIA पथकांनी आरोपींच्या घरांच्या झडती दरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे यासारखी अनेक गुन्हे करणारे साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या साहित्याने आरोपींचे ISIS शी मजबूत आणि सक्रिय संबंध आणि दहशतवादी संघटनेच्या भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी असुरक्षित तरुणांना प्रवृत्त करण्याचे त्यांचे प्रयत्न स्पष्टपणे उघड झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. 

  
एनआयएच्या प्राथमिक तपासात असे सिद्ध झाले आहे की आरोपींनी इस्लामिक स्टेट (आयएस)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (आयएसआयएल)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि यासारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या ISIS च्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्याचा कट रचला होता. या प्रकरणातील आरोपी हे देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वा भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लावण्यात आला. ISIS च्या कटाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात स्लीपर सेलची स्थापना आणि संचालन करून भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या तयारीत होते, अशी माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
  


आरोपी ताबीश नासेर सिद्दीकी, झुबेर नूर मोहम्मद शेख , अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांनी  त्यांच्या साथीदारांसह आयसिसमध्ये तरुणांची भरती केली आणि त्यांना IEDs आणि शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण दिले.  रोपींनी 'डू इट युवरसेल्फ किट्स' (DIY) यासह संबंधित सामग्री देखील आपापसात सामायिक केली होती, ज्यात आयईडी बनवणे आणि लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी बनवणे, आदी माहिती होती.  त्याशिवाय, त्यांच्या परदेशस्थित ISIS हँडलर्सच्या निर्देशानुसार, आरोपींनी बंदी घातलेल्या संघटनेच्या दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील तयार केली होती, असेही एनआयएने म्हटले. पुण्यातून ताब्यात घेतलेला झुबेर हा ISIS शिमोगा (कर्नाटक) च्या दुसर्‍या मोड्यूलशीही संबंध होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.



या चौघांमधील जुबेर शेख हा पुण्यात आयटी इंजिनियर म्हणून काम करत होता. मात्र आयटी मधील ज्ञानाचा उपयोग तो तरुणांना इस्लामिक स्टेटकडे वळवण्यासाठी करत होता. त्यासाठी सोशल मीडियावरून इस्लामिक स्टेटच्या प्रचार आणि प्रसाराचं काम तो करत होता. काही दिवसांपूर्वी कोंढावा भागातून पी एफ आय या संघटनेच्या कार्यकर्त्यांना दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. त्याआधी सादिया शेख या तरुणीला इसिसशी संबंध असल्याच्या आणि सुसाईड बॉम्बर बनण्याच्या तयारीत असल्याच्या आरोपावरुवून अटक करण्यात आली होती. आणि आता झालेल्या या कारवाईमुळे काही दिवसांच्या कालांतरानं इस्लामिक स्टेटची नव - नवीन मोड्यूल निर्माण होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.